वेध – अतिउत्साही साहसाचे बळी!

>> अनघा सावंत

वसाळी पर्यटनाचं आकर्षण नाही अशी व्यक्ती विरळाच. या ऋतूत निसर्गाचं मोहक रूप भुरळ घालतंच. ते मनसोक्त अनुभवावंही, कोण नाही म्हणतं? पण त्याचं रौद्र रूपही तेवढंच भयंकर असतं, याचं भान कोण ठेवणार? ‘स्टेटस’ला ठेवण्यासाठी सेल्फी, रील्स करण्याच्या नादात स्टंटबाजी करताना अनेकांना याचा विसर पडतो आणि तिथेच घात होतो. तर बऱयाचदा पर्यटनस्थळी केलेले मद्यपान, धांगडधिंगा, तसंच अतिउत्साह नडतो आणि मोलाचा जीव गमवावा लागतो. नुकतीच घडलेली लोणावळय़ातल्या भुशी डॅममधील दुर्घटना अक्षरश मन हेलावून टाकणारी आहे. त्याक्षणी पाऊस नसला तरी आपण एवढय़ा लहान मुलांना घेऊन अशा धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये, याची जराही जाण किंवा भीती मोठय़ांना नसेल का? समोर मृत्यू आ वासून उभा असताना, काय झालं असेल त्या कुटुंबाचं, अजून आयुष्यही न पाहिलेल्या त्या निष्पाप लेकरांचं? अशा स्वरूपाच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत, तरीही यातून बोध न घेता आणि प्रशासन वेळोवेळी सावधानतेचा इशारा देत असतानाही केवळ हौसेपायी किंवा स्टंटबाजी करत आयुष्यच पणाला लावणं, कितपत योग्य आहे?

खरं तर समाजमाध्यमांवर प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत रील्स करणं आणि लाइक्स, कमेंट्स मिळवणं, यात आजची तरुणाई आघाडीवर आहे. नुकतीच मिसरुड फुटू लागलेली अल्पवयीन मुलं घरातील विरोधाला न जुमानता घरच्यांच्या गाडय़ा घेऊन जातात तर अनेकदा मित्रांच्या संगतीने सर्रास ट्रिपल सीट बसून गाडी चालवत स्टंट करतात. हुल्लडबाजी करत त्याचे व्हिडीओही करतात. 18 वर्षांखालील मुलांसाठी कोणतीही गाडी चालवणं, हा दंडनीय गुन्हा असूनही सगळे नियम धाब्यावर बसवत गल्लीबोळातून असे दुचाकीवीर पाहायला मिळतात, तर वेगाची नशा असलेले तरुण बिनधास्त मोठय़ा वाहनांना कट मारत सुसाट दुचाकी चालवतात आणि अपघाताला आमंत्रण देत स्वतबरोबर इतरांचा जीवही धोक्यात घालतात.

लोकलमधील स्टंटबाजी तर आपण बऱयाचदा पाहतो. यात रोजच्या महिला-पुरुष फेरीवाल्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. तसंच लोकलमध्ये पी करणारी अल्पवयीन मुलंही चालती ट्रेन पकडणं, ट्रेन थांबण्याआधीच धावत उतरणं असं बिनधास्त धारिष्टय़ दाखवताना दिसतात. तसंच नशा करणारे, बेफिकीर वृत्तीचे तरुण गाडीच्या दरवाजातील खांब एका हाताने पकडून दुसऱया हाताने विजेच्या खांबांना स्पर्श करणं, हातवारे करणे असे स्टंट करून जीव धोक्यात घालतात. कधीकधी महाविद्यालयीन तरुणही या स्टंटबाजीत आघाडीवर असतात. केवळ पावसाळी पर्यटनच नव्हे तर चारचाकी-दुचाकी चालवताना, रस्त्याच्या मधोमध, रेल्वे रुळावर रील्स करताना तसंच लोकलमध्ये इतरांचं लक्ष वेधण्यासाठी स्टंट करणाऱया या स्टंटबाजांनी या दुर्घटनांमधून धडे घेणं आवश्यक आहे.

नुकताच एका तरुणीचा मोबाइलवर रील्स करताना कारवरचं नियंत्रण गेल्याने कारसह थेट दरीत कोसळून मृत्यू झाला, तर ताम्हिणी घाटात एका तरुणाने धाडसाने पाण्यात उडी मारली. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहापुढे टिकाव न लागल्यामुळे त्याला जीव गमावावा लागला. समाजमाध्यमावर याचे व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाले. आता तरी यातून धडा घेत नको तिथे धाडस दाखवणाऱयांनी तसंच स्टंटबाजीची हौस असणाऱयांनी ‘काय होतंय’ या आपल्या बेफिकीर वृत्तीला लगाम घातला आणि संयम राखत जबाबदारीने वागलं तर अशा दुर्दैवी घटनांना नक्कीच आळा बसेल!

[email protected]