
>> अनघा सावंत
निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो. त्यामुळे जंगल सफारी ही एक प्रकारची शैक्षणिक सहलच असते. जंगलातील प्राणी, पक्षी, वनस्पती, झाडे आणि सागरी जीवनाच्या विविध प्रजाती पाहून थक्क व्हायला होतं. जिज्ञासू वृत्ती जागी होते. रोमांचक अनुभवाबरोबरच निसर्गाविषयीच्या महत्त्वपूर्ण माहितीचा ठेवा हाती येतो. जंगल पर्यटन म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यातील एक मौल्यवान सहल, जी नेहमीच अविस्मरणीय अनुभव देते आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपल्याला नव्याने आनंदी, ताजेतवाने करते.
नाशनल जिओग्राफिक किंवा डिस्कव्हरी चॅनेलवरचे वाइल्ड लाइफ तल्लीन होऊन पाहणारे तसेच त्याचे आकर्षण वाटणारे आपल्यापैकी अनेक जण आहेत, पण टीव्ही चॅनेल काय किंवा कुठल्याही प्राणिसंग्रहालयातील प्राणी पाहणं काय, त्याला एक बंदिस्त स्वरूप असतं. वन्य जिवांना अशा स्वरूपात पाहण्याऐवजी घनदाट जंगलात मुक्त विहार करताना पाहणं म्हणजे रोमांचकारी अनुभव असतो. वाघ, सिंह, हत्ती, बिबटय़ा, हरीण, अस्वल, माकड, जंगली मांजर, कोल्हा, नीलगाय, काळवीट यांसारखे वन्य प्राणी आणि विविध प्रकारचे रंगीबेरंगी सुंदर पक्षी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहणे ही एक वेगळीच अनुभूती असते. त्यांच्या अधिवासात जाऊन त्यांना अनुभवायचं असेल आणि निसर्ग अधिक समजून घ्यायचा असेल तर जंगल पर्यटन हे धावपळीच्या जीवनाला दिलासादायी ऑक्सिजन देतं.
तशी हल्ली अनेकांची जंगल पर्यटनाला पसंती दिसतेय. याचं मुख्य कारण म्हणजे त्या व्यक्तीला मुळातच असलेली निसर्ग आणि वन्य जीवनाची आवड. शहरी गजबजाटापासून दूर जंगल पर्यटन म्हणजे त्यांच्यासाठी एक हवीहवीशी संधी असते. दैनंदिन जीवनातील मानसिक ताणतणाव, शारीरिक कष्ट, सोशल मीडिया, प्रदूषण यांपासून ब्रेक घेऊन केवळ आणि केवळ निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने मनाला, शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा मिळते. जंगलातील आनंददायी दृश्यं मनाला निसर्गाशी जोडून शांतनिवांत करतात. असं हे जंगल पर्यटन अगदी मनापासून आवडणाऱ्यांसाठी हिंदुस्थानात अनेक नैसर्गिक जंगलं आहेत.
चंद्रपूर जिह्यातील ‘ताडोबा राष्ट्रीय उद्यान’ हे आकर्षक जंगल असून नागपूरपासून तिनेक तासांच्या अंतरावर आहे. निसर्ग आणि वन्य जीवांची आवड असणाऱ्यांसाठी ताडोबा हे महाराष्ट्रातील अतिशय पसंतीचे ठिकाण आहे. तसेच राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील ‘रणथंबोर व्याघ्र प्रकल्प’ हे एक जगभरातील असंख्य पर्यटकांचे अतिशय लोकप्रिय स्थळ असून जैवविविधतेचा आणि हिंदुस्थानी वन्य जीवनाचा मानबिंदू असलेल्या ‘पट्टेरी वाघा’ला अनुभवण्यासाठी हे उत्तम ठिकाण मानले जाते.
हिंदुस्थानातील सर्वात जुन्या अभयारण्यांपैकी एक असलेलं ‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान’ हे उत्तराखंडच्या नैनितालजवळ असलेलं जंगल पर्यटकांसाठी आकर्षण आहे. इथे केवळ वाघच नव्हे, तर हत्तीही पाहता येतात. वैविध्यपूर्ण वनस्पती, झाडे, पक्षी आणि अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेल्या या अभयारण्यात तुम्ही जीप सफारी तसेच हत्तीवर बसूनही सफारी करू शकता.
‘पिलिभीत व्याघ्र प्रकल्प’ हा हिंदुस्थानातील उत्तर प्रदेश राज्यातील पिलिभीत जिह्यात स्थित आहे. जंगलातील अॅडव्हेंचरचा अनुभव घ्यायचा असेल तर हे घनदाट जंगल एक उत्तम पर्याय आहे. वाघाव्यतिरिक्त येथे भलेमोठे रानडुक्कर, बारासिंग, अस्वल, असंख्य माकडे, मोर, हरणांचे कळप, मुंगूस पाहायला मिळतात. तसेच याच राज्यातील ‘दुधवा राष्ट्रीय उद्यान’ हाही एक अतिशय महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. याव्यतिरिक्त बांधवगढ राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (आसाम), सुंदरवन राष्ट्रीय उद्यान (पश्चिम बंगाल), कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), गीर राष्ट्रीय उद्यान (गुजरात) इत्यादी जंगल पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी प्रसिद्ध ठिकाणं आहेत.
जीप सफारी हा सफारीचा लोकप्रिय आणि पसंतीचा प्रकार आहे. जीप सफारीमध्ये एका वाहनात सहा जण बसू शकतात. सफारीदरम्यान गाईडच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. काही अतिउत्साही पर्यटक सूचनांची पायमल्ली करून आपण प्राण्यांच्या घरी आहोत याचे भान न राखता ध्वनिप्रदूषण तसेच हातवारेही करतात. असे न करता कटाक्षाने जंगलाचे नियम आणि शिस्त पाळली तर जंगल सफारी सर्वार्थाने आनंददायी होते.
निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो. त्यामुळे जंगल सफारी ही एक प्रकारची शैक्षणिक सहलच असते. जंगलातील प्राणी, पक्षी, वनस्पती, झाडे आणि सागरी जीवनाच्या विविध प्रजाती पाहून थक्क व्हायला होतं. जिज्ञासू वृत्ती जागी होते. रोमांचक अनुभवाबरोबरच निसर्गाविषयीच्या महत्त्वपूर्ण माहितीचा ठेवा हाती येतो. सफारीदरम्यान शांततेत ऐकू येणारा पक्ष्यांचा गोड किलबिलाट, प्राण्यांचे विविध कॉल, वाघाचे पगमार्क्स अतिशय सुखद अनुभव देऊन जातात. सफारीत देखण्या, रुबाबदार वाघाला ऐटीत चालताना पाहणं म्हणजे एक पर्वणीच असते. हो, मात्र यासाठी नशीब असावं लागतं. जंगलात खास वाघोबाला शोधणारी आपली नजर इतर प्राणीपक्ष्यांच्याही भरभरून दर्शनाने सुखावते. दूरवर असलेले पक्षी, प्राणी, तळी यांचे निरीक्षण करण्यासाठी मात्र दुर्बीण आणि फोटोग्राफीसाठी कॅमेरा असणे आवश्यक आहे. जंगल पर्यटन म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यातील एक मौल्यवान सहल, जी नेहमीच अविस्मरणीय अनुभव देते आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपल्याला नव्याने आनंदी, ताजेतवाने करते.