आयटीआयच्या नामकरणात सरकारने शिवसेनाप्रमुखांचे नाव वगळल्याने संताप, कौशल्य विकास विभागाचा मुजोरपणा

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) महापुरुष, स्वातंत्र्य सेनानी किंवा समाजसेवकांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने 8 ऑक्टोबर 2024 रोजी घेतला होता. राज्यातील 132 आयटीआयची नावे बदलण्यास मान्यता देण्यात आली, मात्र त्या नामकरणात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव जाणीवपूर्वक वगळले गेले. त्यासंदर्भात शिवसैनिकांनी दिलेले निवेदन मुजोर कौशल्य विकास विभागाने केराच्या टोपलीत फेकले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

शासकीय आयटीआयमध्ये दर्शनी भागात शासनाच्या आदेशानुसार सूचना फलक लागले होते. त्या सूचना फलकात थोर महापुरुष, स्वातंत्र्यसेनानी किंवा समाजसुधारकांची नावे सुचवण्याची सूचना शासनाकडून करण्यात आली होती. त्यानुसार भंडारा जिह्यातील तुमसर आयटीआयला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यात यावे असे निवेदन तेथील शिवसेना विभागप्रमुख अमित मेश्राम यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांना दिले होते. मात्र त्याचा कोणताही विचार न करता तुमसरच्या आयटीआयचे नामकरण काwशल्य विकास विभागाने सम्राट पृथ्वीराज चव्हाण असे करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव तुमसर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण पेंद्राला देण्यात यावे असे पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार मुंबई येथील संचालक कार्यालयाला तसा अहवाल पाठवण्यात आला होता. नामकरणाचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. नामकरण झाल्यावर त्यावर आक्षेप घेणारे पत्रही मिळाले असून तेसुद्धा संचालकांना पाठवण्यात आले आहे असा दावा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूरचे संचालक किरण मोटघरे यांनी केला आहे.