
शेतकरी कर्जमाफीचे पैसे घेऊन शेतीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी साखरपुडे आणि लग्नांवर खर्च करणार अशा पृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आक्षेपार्ह विधानाने राज्यभरात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. शेतकऱयांपासून सर्वच स्तरांवर कोकाटे यांचा तीव्र निषेध होत असून शेतकऱयांचा अपमान करणाऱया कृषिमंत्री कोकाटेंची हकालपट्टी करा, अशा मागणीनेही जोर धरला आहे.
माणिकराव कोकाटे कृषिमंत्री झाल्यापासून सातत्याने शेतकरीविरोधी आक्षेपार्ह विधाने करत आहेत. हल्ली भिकारीही एक रुपया भीक घेत नाही, अशा शब्दांत त्यांनी पीक विमा योजना घेणाऱया शेतकऱयांना हिणवले होते. शुक्रवारी नाशिक येथे अवकाळीग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांनी पुन्हा एकदा शेतकऱयांच्या जखमेवर मीठ चोळले. सिंचनासाठी, शेततळय़ांसाठी, पीकविम्यासाठी सरकार शेतकऱयांना पैसे देते, आता कर्जमाफीची मागणी होत आहे, पण त्यातून मिळालेल्या पैशांचा वापर पुठे करणार तर साखरपुडे आणि लग्नांवर, असा अवमानकारक सवाल त्यांनी शेतकऱयांना केला होता. त्यावर आज तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
कोकाटे कृषी क्षेत्रातले पुणाल कामरा – संजय राऊत
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनीही शेलक्या शब्दांत माणिकराव कोकाटे यांचा समाचार घेतला. कोकाटे कृषी क्षेत्रातले पुणाल कामरा आहेत, असे ते म्हणाले. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱयांना दुखावणारी वक्तव्ये करू नयेत. अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या लोकांना लगाम घातला नाही तर यांचे काही खरे नाही. तिघांची भाषणे ऐकली तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
पैसा जनतेचा आहे, कोकाटेच्या घरचा नाही – सपकाळ
शेतकऱयांचा अपमान करणाऱया कोकाटेंना मंत्रिमंडळातून हाकलून द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. शेतकऱयाला सरकार मदत करते किंवा कर्जमाफी करते म्हणजे काही उपकार करत नाही. तो जनतेचा पैसा आहे, कोकाटेच्या घरचा नाही, असे सपकाळ म्हणाले.
कृषिमंत्री असंवेदनशील – विजय वडेट्टीवार
राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तूर, द्राक्ष, कांदा, भाजीपाला अशा पिकांचे नुकसान झाले आहे. अशा वेळी शेतकऱयांना दिलासा देण्याऐवजी कृषि मंत्र्यांची भाषा असंवेदनशील असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
हे सदनिका लाटण्याइतके सोपे नाही – रोहित पवार
“कोकाटे साहेब, कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱयांना मिळत नाही. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही.’’अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.
सरकार बॅकफूटवर…बावनकुळेंची माफी
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोकाटेंच्या वक्तव्याबद्दल सरकार माफी मागेल, असे म्हटले आहे. कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱयांच्या जखमेवर मीठ चोळू नये, अशी सारवासारवही त्यांनी केली.