
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भाजपविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भाजपचे ओडिशाचे खासदार प्रदीप पुरोहित यांनी लोकसभेत अकलेचे तारे तोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्वजन्म हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा होता. त्यांचा दुसरा जन्म मोदी आहे, असे पुरोहित म्हणाले. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी टीकेची तोफ डागली. नेटिझन्सनीही त्यांना अक्षरशः झोडून काढले. भाजपाने या विधानाबद्दल माफी मागायला हवी, अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली.
शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई गरजेची
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना शासन व्हावे ही मागणी यापूर्वीसुद्धा मी केली आहे. शिवरायांबद्दल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे आणि ती झालीच पाहिजे, अशी मागणी भाजप खासदार, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
कुठून जन्माला येतात असे हे लोक?
हे महाशय संससदेत बोलतात मोदी पूर्व जन्मात छत्रपती शिवाजी होते आणि आता मोदी. याचा अर्थ स्पष्ट आहे भाजपवाले शिवाजी महाराजांना मानत नाहीत. त्यांचे शिवाजी फक्त मोदी आहेत. कुठून जन्माला येतात असे हे लोक? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानाबद्दल भाजपने माफी मागितली पाहीजे, अशी मागणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मोदींनी त्वरित देशाची माफी मागावी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान करण्याचे आणि महाराष्ट्रातील तसेच जगभरातील शिवप्रेमींची अस्मिता दुखावण्याचे नियोजनबद्ध कारस्थान भाजपच्या नेतेमंडळींकडून केले जात आहे. या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जिरेटोप नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर बसवून शिवरायांचा घोर अवमान केला. भाजप शिवद्रोही आहे. शिवरायांचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही. नरेंद्र मोदींनी त्वरित देशाची माफी मागावी आणि शिवरायांबद्दल घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या खासदाराला निलंबित करावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली आहे.