
मानधनात वाढ, पेन्शन, उन्हाळी सुट्टीचे थकीत मानधन अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सोमवार, 1 जुलैला विधान भवनावर धडक देणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदांवर धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.
अंगणवाडी कर्मचाऱयांचे मानधन वाढ, पेन्शन योजना, 2020 व 2021 या वर्षाची उन्हाळी सुट्टीचे थकीत मानधन, ग्रॅच्युईटी हे प्रश्न शासन स्तरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या प्रश्नांची चर्चा होऊ शकली नाही. मात्र आता युद्धपातळीवर या प्रश्नांची चर्चा होऊन निर्णय होण्याची आवश्यकता आहे. आचारसंहिता संपल्याने तातडीने कृती समितीशी चर्चा करून सर्व प्रश्न सोडवावे, अशी मागणी कृती समितीने केली आहे. या संदर्भात अशी बैठक होऊन प्रश्न न सुटल्यास सोमवार, 1 जुलैला विधान भवनावर व जिल्हा परिषदांवर निदर्शने करण्याची नोटीस दिली आहे.