‘लाडक्या बहिणीं’ना मदत करणाऱ्या अंगणवाडी सेविकाच ‘सावत्र बहिणी’ बनल्या आहेत. एक लाख सेविकांच्या कामाचा प्रोत्साहन भत्ता खोके सरकारने अक्षरशः बासनात टाकल्याने संतापाची लाट उसळली आहे. किमान दिवाळीपूर्वी तरी हा प्रोत्साहन भत्ता मिळावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने केली आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेची कोट्यवधी रुपये खर्च करून जाहिरातबाजी करायची व दुसरीकडे त्यांना मदत करणाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता रोखून ठेवायचा? हीच का तुमची आत्मीयता असा सवाल अंगणवाडी सेविकांनी केला आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केल्यानंतर लाभार्थी महिलांचे अर्ज भरण्यासाठी मदतनीस म्हणून अंगणवाडी सेविकांना नेमण्यात आले. एका अर्जामागे त्यांना 50 रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार होता. मात्र चार महिने उलटून गेल्यानंतरही अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नाहीत. त्यांना पैसे मिळत नसल्याने सेविका सरकारविरोधात संताप व्यक्त करीत आहेत.
दिवस-रात्र एक करून अर्ज भरले
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरताना अंगणवाडी सेविकांनी ऑनलाइन पद्धतीने मोबाईल अॅपद्वारे अर्ज सादर केल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाप्रमाणे प्रति लाभार्थी पन्नास रुपये भत्ता देण्यात येईल असे परिपत्रक मिंधे सरकारने काढले होते. दिवस-रात्र एक करून अंगणवाडी सेविकांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरले. मात्र अर्ज भरणाऱ्या बहिणी भत्त्यापासून वंचित ठेवल्या गेल्या. त्यामुळे सरकारने केलेला हा दुजाभाव स्पष्ट होत असून त्यांचा कारभारही चव्हाटावर आला आहे.
■ अंगणवाडी सेविकांना त्यांच्या हक्काचे पैसे नवरात्रीपर्यंत मिळायला हवेत असे पत्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने 30 सप्टेंबर रोजी महिला व बालविकास मंत्र्यांना दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही.
■ मोबाईलवर फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी स्वतःच्या पैशाने डेटा रिचार्ज केला आहे, पण चार महिने उलटूनही सरकारने लाडकी बहीण योजनेच्या कामाचे पैसे का दिले नाहीत, असा प्रश्न अंगणवाडी कर्मचारी संघाचे संघटक चिटणीस राजेश सिंग यांनी केला आहे.