
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील एका हिंदुस्थानी वंशाच्या विद्यार्थिनीचा अमेरिकेत हिट अँड रनच्या घटनेत मृत्यू झाला आहे. व्ही. दीप्ती, असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. टेक्सासमधील डेंटन सिटीमध्ये हिट-अँड-रनच्या घटनेत तिचा मृत्यू झाला, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीप्ती ही तिची मैत्रीण स्निग्धासोबत 12 एप्रिल रोजी कॅरिल अल लागो ड्राइव्हच्या 2300 ब्लॉकजवळून घरी परतत असताना एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. तिची मैत्रीण स्निग्धा देखील गुंटूर जिल्ह्यातील होती. या वर्षी मे महिन्यात तिचे पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण होणार होते. मात्र त्याआधीच तिचा अपघात झाला. 12 एप्रिल रोजी झालेल्या अपघातात दीप्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यातच 15 एप्रिल रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दीप्तीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, स्निग्धावर सध्या शस्त्रक्रिया सुरू आहे आणि तिची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, शनिवारी अमेरिकेतून दीप्तीचा मृतदेह हिंदुस्थानात आणला जाईल आणि आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर सोमवारी सकाळपर्यंत हैदराबादला पोहोचण्याची शक्यता आहे. तिच्या शिक्षणासाठी कुटुंबाने त्यांची शेतीची जमीन विकली होती आणि पुढील महिन्यात तिच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहणार होते. दीप्ती युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्सासमध्ये एमएस करत होती. तिने नरसारावपेट इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी टेक पूर्ण केले होते.