श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात मोठी दुर्घटना, 20 फूटाची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. येथील श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सवादरम्यान मंदिराजवळील 20 फूट लांबीचा भाग कोसळला. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर एसडीआरएफ आणि एनडीआरएफची संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात भगवान वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी त्यांच्या वास्तविक स्वरूपात भक्तांसमोर येतात अशी मान्यता आहे. त्यामुळे या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. अशातच मंदिराचा 20 फूट लांबींची भिंत अचानक कोसळली आणि अनेक भाविक या ढिगाऱ्याखाली अडकले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि एसडीआरएफ, एनडीआरएफ संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली. यानंतर लगेचच त्यांनी बचावकार्य सुरू केले. या अपघातात सात भाविकांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.