
पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून जोडप्यामध्ये काही महिन्यांपासून वाद सुरु होता. अखेर हा वाद टोकाला गेला आणि पतीने पत्नीचा कायमचा काटा काढला. पतीने नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे ही घटना घडली.
ज्ञानेश्वर आणि अनुषा यांचा अडीच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. या विवाहाला ज्ञानेश्वरच्या कुटुंबाचा विरोध होता. ज्ञानेश्वर हा विशाखापट्टणममधील हिंदुस्थान स्काऊट्स अँड गाईड्स ऑर्गनायझेशनमध्ये काम करत होता. ज्ञानेश्वर आणि अनुषा सध्या मधुरावाडा येथे राहत होते.
अनुषा नऊ महिन्यांची गर्भवती होती. ज्ञानेश्वरचे दुसऱ्या महिलेशी प्रेमप्रकरण सुरू आहे असा संशय अनुषाला होता. यावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. ज्ञानेश्वरने अनुषाच्या नातेवाईकांना फोन करुन ती बेशुद्ध पडल्याचे सांगितले. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अनुषाच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ज्ञानेश्वरविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ज्ञानेश्वरची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस पुढील तपास करत आहेत.