तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनाच काम द्या! मुख्यमंत्री चंद्राबाबू यांचा ‘लाडूबॉम्ब’

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानात फक्त हिंदूंनाच काम देण्यात यावे, इतर धर्मीय कर्मचाऱयांची येथून बदली करण्यात यावी, असा ‘लाडूबॉम्ब’ टाकला आहे. चंद्राबाबूंच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूत चरबी वापरण्यात येत असल्याचा आरोप करून चंद्राबाबू नायडू यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर तिरुपती देवस्थान समितीने हिंदू नसलेल्या कर्मचाऱयांसाठी एक ठराव मंजूर केला. या ठरावानुसार 18 कर्मचाऱयांना हटवण्यात आले. आता पुन्हा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनाच काम देण्यात यावे, अशी कर्मठ भूमिका मांडली आहे.

मुमताज बिल्डर्सला जागा देण्याचा निर्णय रद्द

वायएसआर काँग्रेस पक्षाचे सरकार असताना एमआरकेआर आणि मुमताज बिल्डरला तिरुपतीमधील 35 एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय रद्द करण्यात येत आल्याचेही मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.