>> तरंग वैद्य
लग्नसमारंभात घडलेली अनपेक्षित घटना आणि त्या घटनेच्या अनुषंगाने फुलत जाणारं रंजक कथानक असलेल्या ‘अनदेखी’ या वेबसीरिजचा तिसरा सीझन नुकताच आला आहे. प्रेक्षकांना खिळवून टाकण्यात या वेबसीरिजच्या कथानकातील गतिशीलता, उत्तम पटकथा व निर्देशन आणि कलाकारांच्या अभिनयाची साथ मोलाची ठरली आहे.
मनाली सर्वांचे परिचित असे प्रेक्षणीय स्थळ. इथल्याच एका मोठय़ा रिसॉर्टच्या मालकाच्या अमेरिकेतून आलेल्या मुलाचे लग्न. लग्न पंजाबी पद्धतीने असल्यामुळे सर्व श्रीमंती थाटामाटात अनेक दिवसांचा कार्यक्रम. या सर्व संपत्तीचा मालक अटवाल (पापाजी) आता एका प्रकारे निवृत्त आयुष्य जगत आहे. कारण त्याचे सर्व व्यवसाय त्याचा पुतण्या रिंकू यशस्वीरीत्या सांभाळतोय. पापाजी हा गृहस्थ सकाळपासून दारूच्या अंमलाखाली, पण हे त्याच्यासाठी भूषणावह. लग्नाआधीच्या संगीत समारंभात पापाजी आनंदाच्या भरात हवेत गोळी झाडतो ती गोळी बाहेरून मागवलेल्या नर्तकीला लागते आणि तिचा मृत्यू होतो… आणि खरी कथा सुरू होते. मुलीचे प्रेत लपवणे, पुरावे नष्ट करणे, पोलिसांना ‘मॅनेज’ करणे वगैरे. या लग्न समारंभाचे चित्रीकरण करणारी टीमही तिथे असते आणि त्यांच्या कॅमेऱ्यात मृत्यूचे दृश्यही टिपले गेले असते. रिंकू बऱ्यापैकी प्रकरण हाताळण्यात यशस्वी होतो, पण मृत पावलेली मुलगी आसाममधून गायब झालेली असते. त्यामुळे तिच्या शोधात कोलकाता येथून एक पोलीस अधिकारी येतो आणि मिटवलेले प्रकरण उकरून काढू लागतो.
‘अनदेखी’ नावाच्या वेब सीरिजचे हे कथानक. 10 जुलै 2020 ला सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वेब सीरिजचे दहा भाग आले आणि गतिशील रंजक कथानक व पापाजीच्या भूमिकेत हर्ष छाया या अभिनेत्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांना प्रचंड आवडले.
4 मार्च 2022 ला आणखीन 10 भाग घेऊन ‘अनदेखी सीजन-2’ आणि 10 मे 2024 ला 8 भाग असलेला ‘अनदेखी सीजन-3’ आला व हे दोन्ही सीजन पहिल्या सीजन इतकेच प्रभावी ठरले. या भागांमध्ये चित्रीकरण करणाऱ्या टीमला सांभाळणे व त्यांचा निकाल लावणे, पळून गेलेल्या दुसऱ्या नर्तकीचा शोध घेणे, अटवाल परिवारातील आपापसातले खटके, रिंकूचा हॉटेल व्यवसायाशिवाय अमली पदार्थांचा व्यवसाय, हताश होऊन परत गेलेल्या डीएसपी बरून घोषचे परत मनालीला येणे आणि या वेळेस यशस्वीरीत्या गुहेगारांना अटक करून पोलीस खात्याची मान उंचावणे हे सगळे विषय आहेत. जे कथानकात एकमेकांना पूरक असल्यामुळे आपल्याला खिळवून ठेवतात. ‘अनदेखी’च्या कथेला अनेक शाखा आहेत, पण पटकथा एवढी मजबूत आहे की, कुठलीही शाखा अनावश्यक पसरत नाही. मनालीचे सौंदर्य दाखवताना छायाचित्रकार कुठेही कमी पडला नाहीये. पाठलागाची दृश्येही प्रभावी आहेत.
कथा, पटकथा, निर्देशन उत्तम असताना अभिनयाची साथ मोलाची. रिंकू हे वेब सीरिजचे मुख्य पात्र. नकारात्मक छटा असलेली भूमिका सूर्या शर्मा या अभिनेत्याने टाळ्यांची दाद मिळवणारी आहे. बरून घोषचा अभिनय एकदम भारदस्त आहे. अपेक्षा पोरवालने कोयल या आदिवासी तरुणीची भूमिका छान निभावली आहे. तिसऱ्या सीजनमध्ये वरुण बडोलाची एन्ट्री झाली आहे आणि शेवटच्या भागात ते कोण आहेत हे रहस्य उलगडले आहे. हर्ष छाया या अभिनेत्याची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे. ‘अनदेखी’चा पहिला सीजन बघितल्यानंतर पुढच्या सीजनची वाट बघण्याचे मुख्य कारण हर्षने साकारलेले पापाजी हे पात्र होते. तीन सीजन, 28 खिळवून ठेवणारे भाग आणि शिव्या असूनही ही संपूर्ण मालिका तुम्ही सहपरिवार बघू शकता.
– [email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)