कलापरंपरा – कातळखोदशिल्पांची प्राचीन संस्कृती

>>प्रतिभा वाघ

प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला या कातळखोदशिल्पांचा अभिमान वाटावा असा हा ठेवा आहे. कातळखोदशिल्पांचा अभ्यासाच्या प्रगतीनुसार नवनवे प्रश्न समोर येत आहेत आणि त्यांची उत्तरे शोधताना उत्क्रांतीचे टप्पे स्पष्ट होतात. रत्नागिरी परिसरात 76 गावात 132 ठिकाणी आजपर्यंत 1700 खोदशिल्पे सापडली आहेत. 2023 च्या युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथील काही ठिकाणांची निवड झाली आहे. यावरून याचे प्रागैतिहासिक महत्त्व आपण जाणले पाहिजे.

कातळखोदशिल्पांवर होत असलेल्या अभ्यासातील प्रगतीनुसार नवनवे प्रश्न समोर येत आहेत आणि त्यांची उत्तरे शोधताना उत्क्रांतीचे टप्पे स्पष्ट होत आहेत. रत्नागिरी परिसरात 76 गावात 132 ठिकाणी आजपर्यंत 1700 खोदशिल्पे सापडली आहेत. भूशास्त्राच्या दृष्टीने देवाचे गोठणे येथील कातळशिल्पात चुंबकिय विस्थापन (Magnetic deflection) आढळते. अंदाजे 20 चौरस फूट लांबीरुंदीच्या चौकोनात मनुष्याकृतीचे शिल्प आहे. त्यावर किंवा चौकोनात होकायंत्र ठेवले तर ते चुकीची दिशा दाखवते.

कातळखोदशिल्पांमधील अजून एक सुंदर व सर्वात मोठी कलाकृती म्हणजे कशेळी येथील हत्ती. याचे विशेष म्हणजे या हत्तीच्या आकारात 70 ते 80 इतर प्राण्यांच्या आकृती कोरल्या आहेत. शार्क, वाघळी, वाघ, पाणघोडा, विविध पक्षी अशी जैविक विविधता दिसते. बारसू येथे 62 कातळखोदशिल्पे आढळतात. यात एका शिल्पात मध्यभागी एका माणसाची आकृती असून त्याच्या दोन्ही बाजूंना दोन वाघांच्या आकृती आहेत. त्यांच्यापासून सुटका करण्याचा तो माणूस प्रयत्न करताना दिसतो. तेच चित्र जर विरुद्ध बाजूने समोर जाऊन पाहिले तर एक मोठे गलबत समुद्रातून जाताना दिसते. हलणाऱया लाटा, शिडे, पाण्यात पोहणारे मासे असे सुंदर दृश्य दिसते.

उक्षी येथील हत्तीचे कातळखोदशिल्प लक्षात राहते ते त्याच्या प्रचंड आकारमानामुळे आणि त्या कातळखोदशिल्पाभोवती त्याची काळजी घेण्यासाठी असलेल्या दगडी भिंतीमुळे. गावकऱयांनी स्वखर्चाने ही भिंत उभी केली आहे. लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा आहे. हा हत्ती एका अखंडित रेषेत खोदला असून त्यांची उंची पायापासून खांद्यापर्यंत 12 फूट असून शेपटीपासून कानापर्यंत 18 फूट आहे. हा नरहत्ती आहे. त्याचे दोन सुळे, दोन कान दिसतात, पायही दोन दिसतात.

मुंबईचे दुसरे एक शिल्पकार आणि मुंबई कलामहाविद्यालयाचे प्राचार्य मुकेश दत्तात्रय पुरो. आंतरराष्ट्रीय मुद्रा (नाणे) संकल्पना स्पर्धा 2023 या जपान मिंट आयोजित स्पर्धेत जगातील 250 राष्ट्रांकडून संकल्पना मागविण्यात आल्या होत्या. यातील पहिल्या पाच निवडक कलाकृतींमध्ये पुरो यांच्या संकल्पनेची निवड झाली आणि ही संकल्पना कातळखोदशिल्पासंबंधी असून त्यात कशेळी येथील हत्तीचे चित्रण आहे. रत्नागिरी हापूस आंब्यासाठी जगप्रसिद्ध असल्याची नोंद त्यांनी संकल्पनेत करून नाण्यांच्या वर आंब्याचा बाहय़ाकार घेऊन त्यात हत्तीचे चित्रण आहे. जगातील 250 प्रवेशिकांतून पहिल्या पाचांत निवड झाल्याबद्दल मुकेश पुरो यांचे अभिनंदन. 113 मि.मि. व्यास असलेल्या व 1 मि.मि. जाडीच्या प्लास्टर आाफ पारिसच्या चकतीवर हे कोरीव काम केले आहे. सदर निवड झालेल्या कलाकृती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मुद्रा विक्रीसाठी आणल्या जातात. पुरो यांची मुद्रा रत्नागिरीच्या कातळखोदशिल्पांची जगाला ओळख करून देणार आहे.

निसर्गयात्री ही रत्नागिरीमधील संस्था या कातळखोदशिल्पांपर्यंत अधिकाधिक लोक पोहोचावेत यासाठी प्रयत्नशील आहे. या संस्थेचे सुधीर रिसबूड, सुरेंद्र ठाकूरदेसाई, धनंजय मराठे आणि त्यांचे अनेक सहकारी कातळखोदशिल्पांसंबंधी लोकांमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी व्याख्याने, प्रदर्शने, स्थळभेट असे कार्यक्रम आयोजित करतात. 2017 मध्ये पुरातत्व विभागाच्या या कार्यातील सहभागाने प्रयत्नांना यश मिळत आहे. महत्त्वाची घटना म्हणजे 2023 च्या युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथील काही ठिकाणांची निवड झाली आहे. कातळखोदशिल्प ही सर्वात प्राचीन संस्कृती असून याबाबत विविध शाखांतून एकत्रित अभ्यास होणे गरजेचे आहे. मानववंशशास्त्र, जीवशास्त्र याबाबत दीर्घकाळ संशोधन करता येईल. हा समृद्ध वारसा जतन व्हावा, रत्नागिरीतील पर्यटन वाढून लोकांना रोजगार मिळावा यासाठी निसर्गयात्री धडपड करीत आहे.

प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला या कातळखोदशिल्पांचा अभिमान वाटावा असा हा ठेवा आहे. शालेय पाठय़पुस्तकात यासंबंधीचा धडा असणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे शालेय जीवनात मुलांना याचे महत्त्व समजेल. मुलांच्या सहली या क्षेत्रास भेट देतील. यासाठी शाळांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कलेच्या अभ्यासक्रमात तर कातळखोदशिल्पांचा समावेश करायलाच हवा. शासनाने यात लक्ष घातले तर हे सहजशक्य आहे.

एका घटनेचा उल्लेख टाळता येत नाही. डिसेंबरच्या दुसऱया आठवडय़ात ‘दी पुणे स्कूल आण्ड होम फार ब्लाइंड बाइज’ कोरेगाव पार्क येथील अंध विद्यार्थ्यांनी कातळखोदशिल्पांना भेट दिली. निव्वळ स्पर्शाद्वारे त्यांनी कशेळीच्या हत्तीला पाहिले. अंध विद्यार्थी हा आनंद घेऊ शकतात मग आम्ही इतरांनी डोळसपणे कातळखोदशिल्प नक्कीच पाहायला हवीत, नाही का?

[email protected]
(लेखिका चित्रकर्ती, लोककला अभ्यासक व कलाशिक्षण तज्ञ आहेत)