बाप्पा जाणार गावाला!

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’ असा जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर उद्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. गेले दहा दिवस भक्तांकडून पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा आपल्या गावी जाणार आहेत. बाप्पाचे विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी पालिका आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून पालिकेचे सुमारे 12 हजार अधिकारी – कर्मचारी, 71 नियंत्रण कक्ष तसेच अन्य यंत्रणा विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. विसर्जनासाठी 69 नैसर्गिक स्थळांसह एपूण 204 पृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था केली आहे. विसर्जन मिरवणुकांमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय चौपाट्यांवर पॅमेरे, ड्रोनची नजर असणार आहे. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले असून काही मार्गांवर एकतर्फी वाहतूक असणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई शहर आणि उपनगरात बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. मूर्ती साकारण्यासाठी कार्यशाळांमध्ये सुरू असलेली लगबग, पूजा आणि सजावटीच्या साहित्याने फुललेल्या बाजारपेठा असे चित्र दिसत होते. गणेशोत्सवानिमित्त घराघरात आणि गल्लोगल्लीत ऐपू येणारे आरतीचे सूर, ठिकठिकाणी सुरू असलेले सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका यामुळे  गेले दहा दिवस शहरात मंगलमय वातावरण होते. बघता बघता आता विसर्जनाचा दिवस उजाडला आहे. बाप्पाची विसर्जन मिरवणूकदेखील दणक्यात व्हावी यासाठी मंडळांनी जोरदार तयारी केली आहे. लालबाग-परळमध्ये लाखोंच्या संख्येने होणारी गर्दी लक्षात घेता येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा असणार आहे. बाप्पाचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गिरगाव, माहीम, वर्सोवा, मढ, मार्वे, जुहू, सातबंगला अशा विविध चौपाट्यांवर गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

चौपाट्यांवर ‘बेस्ट’च्या सहकार्याने खांबांवर व उंच जागी सुमारे 1,097 फ्लडलाईट आणि 27 सर्चलाईट लावले आहेत. भक्तांच्या सोयीसाठी 127 फिरती प्रसाधनगृहे सज्ज ठेवली आहेत. पालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून 75 प्रथमोपचार केंद्रांसह 67 रुग्णवाहिकादेखील सज्ज आहेत.

761 जीवरक्षकांसह 48 मोटरबोटी तैनात

विसर्जनासाठी येणारी वाहने चौपाटीवरील वाळूमध्ये अडपू नयेत, याकरिता चौपाटीच्या किनाऱ्यांवर 478 स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी 43 जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था पालिकेतर्फे करण्यात आली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 761 जीवरक्षकांसह 48 मोटरबोटी तैनात केल्या आहेत. मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 192 नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने 66 निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. विविध ठिकाणी 72 स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत.

रेल्वे स्टेशनवर कडेकोट पोलीस बंदोबस्त

सर्व रेल्वे स्थानकांवर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. चर्चगेट, चर्नीरोड, ग्रँटरोड, मरीनलाइन्स, भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, दादर या रेल्वे स्थानकांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. मंगळवारी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस उपायुक्त, चार सहाय्यक पोलीस आयुक्त, 46 पोलीस निरीक्षक, 30 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 114 पोलीस उपनिरीक्षक, 2950 पोलीस अंमलदार, दोन हजार होमगार्ड, 150 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान, तीन दंगल नियंत्रण पथके, आरसीपी, चार जलद प्रतिसाद पथकाच्या हिट क्यूआरटी, बीडीडीएस आणि डॉग स्कॉड यांच्यासह मुख्यालयातील दीडशेहून अधिक पोलीस अंमलदार तैनात असतील.

अशा लोकल धावणार

पश्चिम रेल्वेने मंगळवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी चार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यानुसार चर्चगेटहून विरारसाठी रात्री 1.15, 1.55, 2.25 आणि पहाटे 3.20 वाजता लोकल सुटेल. परतीच्या मार्गावर विरारहून चर्चगेटसाठी रात्री 12.15, 12.45, 1.40 आणि पहाटे 3 वाजता लोकल चालविण्यात येणार आहेत.  मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे / कल्याण दरम्यान रात्रीच्या वेळी लोकलच्या 22 जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी – कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री 1.40 वाजता तसेच पहाटे 3.25 वाजता सुटणार आहे. तर सीएसएमटी – ठाणे विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री 2.30 वाजता सुटेल. कल्याण – सीएसएमटी विशेष लोकल कल्याणहून रात्री 12.05 वाजता सुटेल. ठाणे – सीएसएमटी विशेष लोकल ठाण्याहून रात्री 1 वाजता तसेच रात्री 2 वाजता सुटेल. हार्बर मार्गावर सीएसएमटीवरून पनवेलसाठी रात्री 1.30 वाजता आणि रात्री 2.45 वाजता लोकल सुटेल. पनवेलहून रात्री 1 वाजता तसेच रात्री 1.45 वाजता लोकल सुटणार आहे.

13 पुलांवर मिरवणुका थांबवू नका

13 पुलांबाबत सतर्क करण्यात आले आहे. मध्य रेल्वेवरील घाटकोपर ओव्हर ब्रिज, करी रोड, चिंचपोकळी, भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिजवरून मिरवणूक नेताना खबरदारी घ्यावी. तसेच मरीन लाईन्स, सँडहर्स्ट रोड, ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोड दरम्यान असणाऱ्या फ्रेंच ब्रिज, केनेडी ब्रिज, बेलासीस ब्रिज, महालक्ष्मी स्टील रेल्वे ब्रिज, प्रभादेवी पॅरल रेल्वे ओव्हर ब्रिज, दादर टिळक ब्रिजवर जास्त वेळ मिरवणूक थांबवू नका. या ब्रिजवर एकाच वेळी 100 पेक्षा जास्त जणांना जाता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.

पहाटेपर्यंत लोकल धावणार

विसर्जनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांना रात्री उशिरादेखील घरी परतता यावे यासाठी पश्चिम रेल्वेने मंगळवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी चार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

20 हजार पोलीस तैनात

विसर्जनासाठी पोलीस दक्ष असून मुंबईत 40 पोलीस उपायुक्त 50 सहाय्यक आयुक्तांसोबत 20 हजार 500 पोलीस कर्मचारी असा प्रचंड फौजफाटा उद्या तैनात असणार आहे.

अनंत चतुर्दशीला सकाळी 11.14 वाजता 4.54 मीटरची भरती, सायंकाळी 5.22 वा. 0.86 मीटरची ओहोटी, रात्री 11.34 वा. 4.39 मीटर उंचीची भरती, 18 सप्टेंबरला पहाटे 5.27 वा. 0.48 मीटरची ओहोटी, सकाळी 11.37 वा. 4.71 मीटरची भरती असेल.

खोल समुद्रात जाऊ नका

समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नका, विसर्जनाकरिता पालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्या, अंधार असणाऱ्या ठिकाणी विसर्जनाकरिता जाणे टाळावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहनही पालकांना करण्यात आले आहे.