देवदर्शनासाठी अनंत अंबानींची 170 किलोमीटरची पदयात्रा, जामनगर ते द्वारका रोज 20 कि.मी. चालणार

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी पदयात्रेमुळे चर्चेत आले आहेत. देवदर्शनासाठी त्यांनी 29 मार्चपासून जामनगर ते द्वारका अशी तब्बल 170 किलोमीटरची पदयात्रा सुरू केली आहे. गेल्या 9 दिवसांपासून ते रोज 20 किलोमीटर चालत आहेत.  वाटेत ते अनेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्याशी गप्पा मारत असल्याचे चित्र आहे. दिवसा ते विश्रांती घेत असून रात्री पदयात्रा करत आहेत.

10 एप्रिल रोजी 29 वर्षीय अनंत अंबानी यांचा वाढदिवस असून त्याआधी म्हणजेच 8 एप्रिल रोजी ते द्वारकानगरीत पोहोचणार आहेत. पदयात्रेदरम्यान ते हनुमान चालिसा, सुंदरखंद आणि देवी स्तोत्र यांचे पठण करत आहेत. दरम्यान, दिवसा  वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनंत अंबानी यांनी रात्री पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.