कडेकोट बंदोबस्तात सभा घेता, सर्वसामान्यांना थांबवून ठेवता, कश्मीरला तुम्ही पिंजरा बनवून टाकलं आहे, असा संताप व्यक्त करत एनआयटीच्या एका विद्यार्थ्याने श्रीनगर येथे गुरुवारी प्रचारासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
कश्मीरमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी यांची येथील शेर-ए-काश्मीर पार्कमध्ये जाहीर सभा झाली. या सभेसाठी श्रीनगरमध्ये आज कडेकोट बंदोबस्त होता. पावलापावलावर पोलीस, सुरक्षा दलांचे जवान तैनात होते. सभा होणाऱ्या परिसरातील सर्व वाहतूक, नागरिकांची ये-जा सुरक्षेच्या कारणास्तव रोखण्यात आली होती. यामुळे घरातून कॉलेज आणि परत घरी जाण्यासाठी दिवसभर अनेक किलोमीटरची पायपीट सर्वसामान्य आणि विद्यार्थ्यांना भर उन्हात घामाच्या धारा पुसत करावी लागली.
या संतापाचा जणू स्फोटच या तरुणाच्या बोलण्यातून झाले. ही कुठली लोकशाही आहे. कलम 370 रद्द केलं तेव्हाही विद्यार्थ्यांविषयी विचार केला गेला नव्हता. आताही आमचा विचार करत नाहीत, अशी सरबत्ती या तरुणाने सुरू केल्यावर बंदोबस्तावरील कर्मचारीही गांगरले होते.