मुसळधार पावसामुळे दुकानाची जीर्ण भिंत झोपडीवर कोसळल्याने एका आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी लोअर परळ परिसरात घडली. या घटनेत एक जेष्ठ महिला जखमी झाली आहे. जखमी महिलेवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोअर परळ येथील दीपक सिनेमाजवळ ही घटना घडली. रेणुका अनंत काळसेकर असे मयत मुलीचे नाव आहे तर जयश्री गौतम पवार असे जखमी महिलेचे नाव आहे.
मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दुर्घटनाग्रस्त दुकानाचा ढाचा कमकुवत झाल्याने धोकादायक बनला होता. पावसामुळे दुकानाची जीर्ण भिंत शेजारील झोपडीवर कोसळली. यावेळी झोपडीत जेष्ठ महिला आणि आठ वर्षाची मुलगी उपस्थित होत्या. भिंत कोसळल्यानंतर दोघीही मलब्याखाली दबल्या गेल्या. प्रसंगावधान राखत स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघींना मलब्यातून बाहेर काढत केईएम रुग्णालयात दाखल केले.
रूग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी जखमी रेणुकाला मृत घोषित केले. तर जयश्री यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.