ठाण्याची हवा बिघडणार की सुधारणार, आधीच कळणार; प्रदूषणाची आगाऊ माहिती ‘क्लिन एअर बेटर हेल्थ’ अॅप देणार

वाढती लोकसंख्या आणि वाढत्या शहरीकरणामुळे गेल्या काही वर्षांत ठाण्यात प्रदूषणात वाढ होत आहे. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका स्थरावर वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असून ठाण्याची हवा बिघडणार की सुधारणार हे आता आधीच कळणार आहे. शहरात होणाऱ्या प्रदूषणाची आगाऊ माहिती मिळण्यासाठी प्रशासनाने ‘क्लिन एअर बेटर हेल्थ’ हा अॅप कार्यान्वित केला असून हवेची गुणवत्ता तपासून त्यात आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. दरम्यान आगामी हिवाळ्यात हवेची गुणवत्ता राखता येणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

ठाण्याच्या प्रदूषित हवेच्या गुणवत्तेने उच्चांक गाठला असल्याचे पालिकेच्या प्रदूषण विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेले दिसून आले. मागील वर्षाच्या पहिल्या तीन दिवसांतच हवेचा निर्देशांक तब्बल दोनशेवर पोहोचला होता. त्यामुळे ठाणेकरांचा श्वास कोंडला असल्याने ठाणेकरदेखील हवालदिल झाले होते. प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सपशेल फेल ठरली होती. दरम्यान मुंबईपाठोपाठ ठाण्यात हवा अतिशय प्रदूषित झाल्यानंतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले होते.

बाजूला शहराला आएका दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांची साथ लाभली असल्याने इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत ठाण्यातली हवा चांगली असते. मात्र ही हवा सर्व काळात उत्तम रहावी, यासाठी ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा’ या नवीन ऑनलाइन साधनाचा नक्कीच उपयोग होईल.

तत्काळ बदल करणे शक्य

कृती आराखड्यानंतर शहरासाठी हवेची गुणवत्ता तपासून त्यात आवश्यक ते बदल सुचवणाऱ्या नवीन यत्राची मोलाची भर पडली आहे. या यंत्रणेमुळे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून तत्काळ करायचे बदल आणि दीर्घकाळात करायला लागणारे बदल याचे नियोजन करणे महापालिकेस शक्य होईल.

राज्यात प्रथमच ही यंत्रणा ठाण्यात सुरू

‘क्लिन एअर आणि बेटर हेल्थ’ या प्रकल्पांतर्गत ठाणे महापालिकेसाठी ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा’ तयार करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे हवा प्रदूषणाशी सामना करण्यासाठी माहिती मिळणार आहे. त्यातून प्रशासनाला आधीच उपाययोजना करता येणार आहेत. राज्यात प्रथमच ही यंत्रणा ठाण्यात सुरू होत आहे.