शेअर मार्केटच्या माध्यमातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील अर्थप्लस इन्व्हेस्टमेंट नावाच्या एजन्सीने जांबरगाव (तालुका वैजापूर) येथील राज्य सहकारी कापूस पणन महासंघाच्या सेवानिवृत्त ग्रेडरला (कापूस प्रत निर्देशक) 22 लाख 73 हजार 500 रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार वैजापुरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी निवृत्त ग्रेडर सुनील पाटील यांनी तक्रार दिल्यानंतर तिघांविरुद्ध वैजापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी रात्री नऊ वाजता दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहेत.
विनोद उत्तमराव पाटील (रा. तिरुपतीनगर, धुळे), सुनील गंगाधर पाटील (रा. चोपडा, जळगाव) व नवनीत हिरालाल पाटील (रा. वडली, जि. जळगाव) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद उत्तम पाटील हा तक्रारदार सुनील पाटील यांचा पुतण्या, सून, सध्या तो पुणे येथे राहतो. खासगी नोकरी सोडून तो तो शेअर मार्केटचे काम करतो. दुसरा आरोपी सुनील गंगाधर पाटील हा बीएएमएस डॉक्टर असून विनोद पाटील याचा भावजी आहे. तिसरा आरोपी नवनीत पाटील हा उच्च पदवीधर असून, तो विनोद पाटील याचा मावसभाऊ आहे.
या तिघांनी पुण्यातील वाकड अर्थप्लस इन्व्हेस्टमेंट नावाची एजन्सी सुरू केली. सुनील पाटील यांची मुलगी विवाहित असून, ती पुण्यात राहते. तिने २०२१ मध्ये या तिघांच्या कंपनीत काही रक्कम गुंतवली व तिला चांगला परतावा मिळाला, पाटील यांची पत्नी वंदना या एकदा मुलीस भेटण्यासाठी पुण्यात गेल्या असता मुलीने आईला शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत सांगितले व विनोद पाटील, सुनील पाटील व नवनीत पाटील यांच्या ऑफिसला भेट दिली. त्यावेळी आरोपींनी दोघींना शेअर मार्केटमध्ये कसे काम चालते याबाबत सांगितले. त्यानंतर वंदना यांनी घरी जांबरगाव येथे आल्यानंतर पती सुनील पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यांना निवृत्तीनंतर ५० लाख रुपयांची रक्कम मिळाली होती. ही रक्कम गुंतवण्यासाठी त्यांनी पुतण्या विनोद पाटील याच्या आईवडिलांना फोनवर विचारून माहिती घेतली. त्यामुळे सुनील पाटील यांनी आरोपींना विचारले असता आम्ही तुम्हाला गुंतवलेल्या रकमेच्या चार टक्के मुद्दल व चार टक्के व्याज दरमहा परतफेड देऊ असे आमिष दाखवले.
या आमिषाला भुलून सुनील पाटील यांनी सुरुवातीला 8 ऑगस्ट 2022 मध्ये एजन्सीच्या अकाऊंटमध्ये दहा लाख रुपये पाठवले. त्यानंतर वेगवेगळ्या तारखेत रकमा भरत 8 ऑगस्ट ते 7 फेब्रुवारी 23 या कालावधीत एकूण 40 लाख रुपये भरले. त्यातील 17 लाख 26 हजार रुपये परत मिळाले. परंतु उरलेल्या रकमेबाबत विचारणा केली असता ज्या ठिकाणी पैसे गुंतवले तो व्यक्ती खूप मोठ्या रकमेचा अपहार करून पळून गेल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुनील पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यावरून विनोद उत्तमराव पाटील, सुनील गंगाधर पाटील व नवनीत हिरालाल पाटील या तिघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.