उल्हासनगर पालिकेत लाखोंचा जाहिरात घोटाळा

उल्हासनगर महानगरपालिकेत लाखोंचा जाहिरात घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जाहिरात विभागातील कर्मचाऱ्यांनीच निवडक कंपन्यांसोबत सेटिंग करून महापालिकेचा महसूल बुडवला आहे. याप्रकरणी तत्कालीन पालिका आयुक्तांनी लेखापरीक्षण करण्याचे आदेश देऊनही कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने महापालिकेच्या कार्यभारावर संशय व्यक्त केला जात आहे.

महापालिका क्षेत्रातील अनेक जाहिरात कंपन्या राजकीय पक्षांशी संबंधीत आहेत. नेत्यांचा दबाव व कर्मचाऱ्यांसोबत हातमिळवणी करून निवडक जाहिरात कंपनी महापालिकेचा लाखोंचा महसूल बुडवत आहेत. कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी जाहिरात विभागातील कर्मचारी अर्ज करणे, फाइल्स बनवणे, पैसे न भरता परवानगी देणे, परवानगीपेक्षा जास्त होर्डिंग आणि जाहिराती लावणे व इतर कामांकडे दुर्लक्ष करतात. तसेच निवडक ठेकेदारासाठी काम करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे असे गैरप्रकार महानगरपालिकेच्या जाहिरात विभागात होत आहेत. त्यामुळे महानगरपालिका आणि सरकारचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला आहे. याप्रकरणी महानगरपालिकेची दिशाभूल करून वैयक्तिक फायदा करून महसूल बुडवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी लावून कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही रोहित साळवे यांनी पालिका आयुक्त विकास ढाकणे यांना दिला आहे. साळवे यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. याप्रसंगी ब्लॉक अध्यक्ष नाणिक आहुजा, सुनील बेहरानी, प्रवक्ता आशेराम टाक, महासचिव दीपक सोनावणे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष निहाल रपेकर उपस्थित होते.

चौकशीचे आदेश देऊनही दुर्लक्ष

अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी 2022 मध्ये जाहिरात विभागात अनियमितता व निविदा प्रक्रिया होत नसल्याने घोटाळा होत असण्याची शक्यता वर्तवली होती. लेंगरेकर यांनी ही बाब तत्कालीन आयुक्त राजा दयानिधी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तेव्हा दयानिधी यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर लेंगरेकर यांनी 2023 मध्ये जाहिरात विभागाचा भोंगळ कारभार तत्कालीन आयुक्त डॉ. अजिज शेख यांच्याही निदर्शनास आणून दिला होता. त्यावेळी शेख यांनी लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कुंपणच शेत खात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.