अमूलचे दूध एक रुपयाने स्वस्त

देशातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी अमूलने ग्राहकांना दिलासा दिलासा दिला आहे. कंपनीने त्यांच्या अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल टी स्पेशल या एक लिटरच्या पाकिटांच्या दरात एक रुपयाची कपात केली आहे. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

जून 2024 मध्ये अमूलने दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ केली होती. या दरवाढीनंतर मदर डेअरीनेही दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ केली होती. या दरवाढीनंतर अमूल गोल्डच्या 500 मिली पाकिटाची किंमत 32 रुपयांवरून 33 रुपये झाली होती, तर एक लिटर अमूल गोल्डची किंमत 64 रुपयांवरून 66 रुपये प्रति लिटर झाली होती. त्याचबरोबर अमूल ताजाच्या अर्ध्या लिटर पॅकसाठी 26 रुपयांऐवजी 27 रुपये तसेच अमूल शक्तीच्या अर्ध्या लिटर पॅकेटची किंमत 29 रुपयांवरून 30 रुपये झाली होती.