धावत्या शिवशाही बसने घेतला पेट; प्रवासी सुखरूप

यवतमाळच्या दिशेने जाणाऱया शिवशाही बसला बडनेरा ते यवतमाळ मार्गावर माहुली चोर गावानजीक अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. यामुळे एकच गोंधळ उडाला. चालकाने वेळीच सावधगिरी बाळगत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अमरावती आगाराची शिवशाही बस माहुली चोर या गावानजीक पोहोचली असताना बसच्या केबिनमधून धूर यायला सुरुवात झाली. बसचालकाने प्रसंगावधान राखून रस्त्याच्या कडेला बस थांबवली. बसचालक आणि वाहकाने तीनही प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजूंची वाहतूक नियंत्रित केली.