देशभरात खासगी संघटित क्षेत्रात काम करणाऱया व्यक्तीचे ईपीएफओ खाते असते. ईपीएफओमध्ये कोटय़वधी कर्मचारी जोडलेले आहेत. लवकरच ईपीएफओमध्ये नवे बदल पाहायला मिळू शकतात. यापुढे कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 12 टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम ईपीएफओमध्ये गुंतवता येणार आहे. कर्मचारी त्यांच्या कमाईच्या क्षमतेप्रमाणे पीएफमध्ये योगदान देऊ शकतात, असादेखील बदल केला जाईल. पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी खातेधारकांना एटीएमचा वापर करता येईल, अशी सुविधादेखील नव्या अपडेटमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार ईपीएफओमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. याअंतर्गत केंद्र सरकार ईपीएफओ 3.0 अपडेट आणण्याच्या तयारीत आहे. प्राप्तिकर विभागाने काही दिवसांपूर्वीच पॅन 2.0 ची घोषणादेखील केली आहे. आता ईपीएफओमध्येदेखील नवे बदल पाहायला मिळू शकतात. यामध्ये ईपीएफ खातेधारकांसाठी नव्या घोषणा केल्या जाऊ शकतात.
ईपीएफओ 3.0
ईपीएफओ 3.0 च्या सुधारणा दोन टप्प्यांत केल्या जाऊ शकतात. ईपीएफओ 2.0 नुसार सुधारणा डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण केल्या जाणार आहेत. ईपीएफओ 3.0 मे, जून 2025 मध्ये पूर्ण होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
स्मार्ट कार्ड मिळणार
डेबिट कार्डप्रमाणे एक स्मार्ट कार्ड पीएफ खात्याशी संबंधित असे जारी केले जाऊ शकते. त्या स्मार्ट कार्डचा वापर करून पीएफ खात्यातील रक्कम काढता येईल. मात्र, त्यावर मर्यादा असेल. पीएफ खात्यातील एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो. ईपीएफओ 3.0 अपडेट मे – जून 2025 मध्ये लागू केले जाऊ शकते.