महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त आम्हीच घेतलाय का? अजितदादा गट आणि भाजपात वाजलं

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका रंगली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने झिडकारल्याने बिथरलेल्या भारतीय जनता पक्षाने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याचे खापर अजित पवार यांच्यावर फोडले. हा वाद शमत नाही तोच विधानसभा निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत. कोणत्याही क्षणी याची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पाणीपत होण्याची भीती असल्याने भाजपचे कार्यकर्ते अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका बैठकीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्याने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी केली. त्यामुळे अजित पवार गटामध्ये खळबळ उडाली. याच संतापात अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांना थेट इशारा दिला असून महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त आम्हीच घेतलाय का? असा सवालही उपस्थित केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये आपापसात समन्वय महत्त्वाचा आहे. आम्ही टीका करतो तेव्हा अनेकांना वाईट वाटते, पण त्यांनीही आपल्या जिभेला आवर घातला पाहिजे. दुसऱ्याची औकात काढण्यापेक्षा आपलीही औकात पाहिले पाहिजे. माझ्या पक्षाकडून मला नोटीस पाठवण्यात आल्याचे कळते. अद्याप मला नोटीस मिळालेली नाही. मात्र राष्ट्रवादीलाच राष्ट्रवादीने नोटीस द्यावी त्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रवक्त्यांना आणि भाजपाने त्यांच्या प्रवक्त्यांना नोटीस द्यायला पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, महायुती टीकावी ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्र असले पाहिजे. माझ्या पक्षाने माझ्यावर कधीही जबरदस्ती केली नाही. समज नक्कीच दिली आहे. त्यामुळे मी सांभाळून बोलतो. अन्यथा काहींनी माझी औकात काढल्यानंतर त्याला तोडीस तोड उत्तर मलाही देता येते. पण आमच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रोटोकॉल ठेवले असल्याने मी बोलत नाही. पण पुण्यात कोणीतरी गल्लीबोळातला कार्यकर्ता अजित पवारांवर बोलून गेला. मग हे आम्ही शांततेने ऐकायचे का? असा संतप्त सवाल मिटकरी यांनी केला.

राहुल कुल यांच्या उपस्थितीत एक कार्यकर्ता अजित पवारांवर बोलला. महायुतीतील एका नेत्यावर आपल्याच पक्षामधील गल्लीतील कार्यकर्ता बोलतोय हे त्यांना कळलं नाही का? त्यांनी त्याचा विरोध करायला हवा होता. महायुतीची धर्म पाळण्याचा ठेका राष्ट्रवादीनेच घेतला आहे का? भाजपा आणि शिंदे गटानेही प्रोटोकॉल पाळायला हवेत, असा इशारा मिटकरी यांनी दिला.