विखेंकडे संपत्ती आणि सत्ता, लंकेंकडे मायबाप जनता! डॉ. अमोल कोल्हे यांची विखे यांच्यावर टीका

विखे यांच्याकडे एक मुख्यमंत्री, दोन-दोन उपमुख्यमंत्री, दोनशे आमदार आहेत, अफाट पैसा आहे, पाच-पाच पिढ्यांचे राजकारण आहे, यंत्रणा आहे, राज्यातली सत्ता, केंद्रातली सत्ताही आहे. तर दुसरीकडे नीलेश लंके यांच्याकडे काय आहे तर लंके यांच्याकडे त्यांची मायबाप जनता आहे. याच जनतेची ही निवडणूक असून लंके यांनी अर्ज दाखल केला त्याच दिवशी त्यांचा विजय निश्‍चित झाल्याचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर शहरातील माळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहिर सभेत डॉ अमोल कोल्हे यांनी तडाखेबंद भाषण करीत विरोधी उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासह भाजपावर सडकून टीका केली.

यावेळी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, आमच्याकडे एक मुख्यमंत्री चार वेळा येऊन गेले. एक उपमुख्यमंत्री पाच वेळा येऊन गेले, उद्याही परत येत आहेत. दुसरे परवा मोकळे होतील,त्यानंतर ते माझ्या मतदारसंघातच असतील. नगरमध्येही सहा, सात आठ काहीतरी मोठ मोठया सभा लागल्यात म्हणतात. लंके आणि मी दोघेही सामान्य तरीही आमच्या उमेदवारीचा इतका धसका का असा प्रश्‍न उपस्थित करीत सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली असून वरून कोणीही प्रचारासाठी येउ द्या, कीतीही हेलीकॉप्टर उडू द्या, कितीही लँड होऊ द्या, लंके यांचे दिल्लीचे फ्लाईट पक्के असल्याचा दावा डॉ. कोल्हे यांनी केला.

त्या तरूणांचे भविष्य काय ?

मोदी सरकारने सैन्यात अग्निवीरची योजना आणली. सहा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर तरूण सैन्यात भरती होतो. देशांच्या सिमांचे रक्षण करण्यासाठी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरूणांपुढे मोदी सरकारने काय पर्याय ठेवला? सहा महिन्यांचे प्रशिक्षण, चार वर्षांची नोकरी करा. अठराव्या वर्षी कंत्राटी पद्धतीने सैन्यात भरती होऊन बाविसाव्या वर्षी बाहेर पडेल. बाविसाव्या वर्षी काय असेल त्या तरूणाच्या भविष्यात? दरवर्षी दोन करोड नोकऱ्यांचे आश्‍वासन दिले होते. त्याचे काय झाले? असे प्रश्‍न डॉ. कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केले.

नगर-पुण्याचा प्रवास सुकर होईल

पुणे-नगर रेल्वेचा प्रश्‍न विक्रम राठोड यांनी उपस्थित केला तो धागा पकडून डॉ कोल्हे म्हणाले, काळजी करू नका. तुमचे निम्मे काम मी केलेय. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून पुणे-नगर महामार्गाच्या वाहतूकीचा जो प्रश्‍न होता शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी मार्गी लावला आहे. पुण्याच्या फिनिक्स मॉलपासून 18 लेनचा फ्लाय ओव्हर होणार आहे. शिरूरवरून पुण्याला दुसऱ्या मजल्यावरून थेट पोहचता येईल. नगर-पुणे दरम्यान प्रवास असेल तर पहिल्या मजल्यावरून जाता येईल. साडेनऊ हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याने नगर-पुण्याचा प्रवास सुकर होईल असा विश्‍वास डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.