राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडी, शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसबाबत वक्तव्य केले होते. त्यावर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत कोल्हे यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच महाविकास आघाडी एकसंघ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही, शिवसेना झोपेतून जागे व्हायला तयार नाही तर असे वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देत अंबादास दानवे यांनी कोल्हे यांच्यार पलटवार केला आहे. जाग यावी असे कोण म्हणाले मला माहिती नाही. अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार आहेत. संघटनेत 20-30 वर्षे झिजावे लागते ते त्यांना माहित नाही. त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. एखादा पराभव आणि विजय एकाचा नाण्याच्या दोन बाजू आहेत. आघाडीत बिघाडी कुठेही नाही. निवडणूक आली की विजय पराजय होतो, महाविकास आघाडी एकसंघ आहे. आमच्यात फूट पडलेली नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
राज्यात विरोधी पक्षाची ताकद दिसून येत आहे. त्यामुळे विरोधक दिसत नाहीत, या वक्तव्यात फारसे तथ्य नाही. बीड प्रकरणात सगळ्यात आधी विरोधकांनी भूमिका मांडली. विरोधीपक्ष सगळ्या प्रश्नावर बोलत आहेत. बीड प्रकरणात सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आमचा आरोप आहे. वाल्मीक कराड याचा या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग आहे. त्याला पाठीशी घातले जात आहे, असा आरोपही दानवे यांनी केला.