उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या लढतीत अमोल कीर्तिकर यांचा विजय ढापला गेला. मिंधे गटाचे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी ‘संशयास्पद’रीत्या विजयी ठरले. मतमोजणीच्या 26 फेऱ्यांमध्ये सर्वाधिक वेळा शिवसेनेचे अमोल कीर्तिकर आघाडीवर होते. त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र पोस्टल मते मोजताना कालाकांडी करण्यात आली. ऐनवेळी 111 पोस्टल मते बाद झाल्याने गणित फिरले आणि कीर्तिकर यांचा विजय हुकला.
उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघात ईव्हीएम मतमोजणीच्या 26 फेऱया झाल्या. त्यात एकूण 9 लाख 51 हजार 582 मते ईव्हीएमवर नोंदवली गेली. त्यात एक मताने अमोल कीर्तिकर आघाडीवर होते. या मतदारसंघातील पोस्टल मतांची संख्या 3357 होती. त्यातील 111 मते बाद करण्यात आली होती. पोस्टल मतदान मोजणीनंतर अमोल कीर्तिकर यांच्या एकूण मतांची संख्या 4 लाख 52 हजार 596 तर रवींद्र वायकर यांच्या एकूण मतांची संख्या 4 लाख 52 हजार 644 झाली. अवघ्या 48 मतांनी वायकर आघाडीवर होते. त्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पोस्टल बॅलेटमधील बाद ठरलेल्या 111 मतांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. पडताळणीनंतर ती 111 मते बादच असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. अखेर वायकर यांना विजयी घोषित करण्यात आले.
फेरमतमोजणीची विनंती नाकारली
निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी अंतिम निकाल जाहीर करतेवेळी हरकत मागवली होती. त्यानुसार अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीवर आक्षेप नोंदवला. आम्हाला प्रत्येक टेबलवर केलेल्या मतमोजणीबाबत संशय असल्याचे कीर्तिकर यांच्यातर्फे सांगण्यात आले. त्यावर निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन झाले आहे. त्यामुळे आक्षेप विचारात घेऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कीर्तिकर यांची विनंती नाकारली.
आकडेवारीबाबत शेवटपर्यंत संभ्रमच!
अमोल कीर्तिकर यांच्या मताधिक्याचा आलेख प्रत्येक फेरीत वाढताच होता. सलग काही फेऱ्यांमध्ये ते 15 ते 18 हजारांच्या मतांच्या फरकाने आघाडीवर होते. यादरम्यान अमोल कीर्तिकर विजयी झाल्याची बातमी सर्वत्र पसरली, मात्र अचानक मतमोजणीच्या घोळाचे चित्र उभे राहिले. यादरम्यान पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची पुनःतपासणी केली. त्यात आश्चर्यकारकपणे 48 मतांचा फरक दाखवला गेला आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत मतमोजणीचा घोळ सुरू होता.
मिंधे गट, भाजपच्या कार्यकर्त्यांचा धिंगाणा
अमोल कीर्तिकर यांनी रवींद्र वायकर यांना अखेरच्या फेरीपर्यंत ‘काँटे की टक्कर’ दिली. त्यामुळे मिंधे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची धडधड वाढली होती. मात्र टपाली मतांमध्ये 48 मतांचा फरक दिसताच मिंधे गट व भाजपच्या कार्यकर्त्यांनी निकाल जाहीर होण्याआधीच मतमोजणी केंद्रांमध्ये घोषणाबाजी करीत धिंगाणा घातला. काही कार्यकर्ते केंद्रातील अंतर्गत जाळय़ांवर पाय ठेवून तसेच खुर्च्यांवर उभे राहिले. निकाल जाहीर होण्याआधीच कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी संतापल्या. बेशिस्त वागाल तर पोलिसांची मदत घेऊन ताळय़ावर आणले जाईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला. त्यांच्या दट्टय़ानंतर मिंधे गट व भाजपचे कार्यकर्ते शांत झाले. विशेष म्हणजे मतमोजणी केंद्रामध्येही त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यांच्या गोंधळानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्रामध्ये कार्यकर्त्यांसमोर व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू करण्याच्या सूचना केल्या.
650 मतांचा घोळ; फेरमोजणी करा
निकाल जाहीर झाल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना रीतसर पत्र लिहून फेरमतमोजणीची मागणी केली आहे. 26 फेऱ्यांमध्ये काही मतदार यादीतील मतमोजणीमध्ये आमच्या ‘काउंटिंग एजंट’ने दिलेली संख्या व निवडणूक कार्यालयाने उपलब्ध केलेली संख्या यात सुमारे 650 मतांचा फरक आहे. या पार्श्वभूमीवर फेरमतमोजणी करण्यात यावी, अशी मागणी अमोल कीर्तिकर यांनी पत्राद्वारे केली आहे.