‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम देशभरात पाहिला जात असून या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन करतात. या कार्यक्रमात ते केवळ सूत्रसंचालनच नव्हे तर त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से देखिल प्रेक्षकांसोबत शेअर करत असतात. त्यांनी नुकतेच एका एपिसोडमध्ये त्यांच्या बालपणीचा एक किस्सा शेअर केला आहे. ते म्हणाले लहानपणी गंमत म्हणून फ्रिजमध्ये जाऊन बसलो आणि त्यानंतर असे काही झाले की आई-बाबांनी बेदम मारले.
अमिताभ बच्चन केबीसीच्या मंचावर अनेकदा आपल्या खासगी आयुष्यातील किंवा सिनेमाच्या शुट दरम्यानचे अनेक किस्से शेअर करत असतात. सध्या केबीसीचा 16 वा सिझन सुरू असून त्यांनी त्यात एक बालपणीचा गमतीदार किस्सा शेअर केला आहे. ‘कौन बनेगा करोडपती 16’ मध्ये 3 फेब्रुवारीपासून ज्युनियर आठवडा सुरू झाला आहे. तरुण स्पर्धकांनी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट चॅलेंजमध्ये भाग घेतला आणि जो जिंकला तो हॉट सीटवर बसला. गेम खेळत असताना, अमिताभ बच्चन यांनी स्पर्धक प्रणुषा ठमकेशी बोलत असताना आपला बालपणीचा हा किस्सा सांगत आठवणींचा उजाळा दिला.
मी लहानपणी फार उपद्रवी होते. इलाहबादमध्ये राहत असताना घरी पंख्याशिवाय इलेक्ट्रॉनिकच्या कोणत्या वस्तू नव्हत्या. त्यावेळी आमच्याकडे टेबल फॅन होता आणि उन्हाळ्यात आम्ही पंख्यासमोर बर्फाचा तुकडा ठेवायचो मग थंड हवा यायची. त्याचा आनंद घ्यायचो. पुढे ते म्हणाले, ज्यावेळी त्यांच्या घरी पहिल्यांदा मोठा फ्रिज आला त्यावेळी फारच गंमत वाटली. काहीतरी वेगळी आणि नवीन वस्तू होती. त्यावेळी मी फ्रिजमध्ये मावेन एवढ्या उंचीचा होतो. एक दिवस मी घरातल्यांची नजर चुकवत त्या फ्रिजमध्ये जाऊन बसलो आणि दरवाजा बंद झाला. मात्र, दरवाजा बाहेरुन खोलला जात असला तरी आतून तो खोलला जात नव्हता. प्रयत्न करुन दरवाजा न उघडल्याने प्रचंड घाबरलो आणि ओरडायला लागलो. त्यानंतर घरच्यांनी दरवाजा खोलला आणि मला बेदम मारले, असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले.