देश धर्मशाळा नाही, अशांतता पसरवल्यास कठोर कारवाई, गृहमंत्र्यांचा इशारा; लोकसभेत इमिग्रेशन, फॉरेनर्स बिल मंजूर

पर्यटक म्हणून किंवा शिक्षण, आरोग्य सेवा आणि व्यवसायासाठी हिंदुस्थानात येऊ इच्छिणाऱ्यांचे स्वागतच आहे, परंतु रोहिंग्या किंवा बांगलादेशींनी देशात येऊन अशांतता पसरवल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कारण देश ही काही धर्मशाळा नाही. राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरतील अशांना देशात प्रवेश दिला जाणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला. आज लोकसभेत इमिग्रेशन अॅण्ड फॉरेनर्स विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी गृहमंत्री बोलत होते.

हिंदुस्थानात येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांचे अपडेट्स ठेवले जातील. ते कोणत्या मार्गाने येत आहेत? कुठे थांबत आहेत? काय करत आहेत? या सर्व घडामोडींची वेळोवेळी माहिती घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

तृणमूल काँग्रेसवर टीका

 हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवरील 450 किमी लांबीचे पुंपण घालण्याचे काम प्रलंबित आहे. कारण पश्चिम बंगाल सरकारने त्यासाठी जमीन दिली नाही, हे सरकार घुसखोरांवर दया दाखवत आहे, अशी टीका अमित शहा यांनी यावेळी केली.