घोटाळाफेम अजित पवारांना सोबत घेऊन अमित शहा म्हणतात…शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्याच घोटाळाफेम अजित पवारांना सोबत घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत, असे अमित शहा म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनाचा समारोप अमित शहा यांच्या भाषणाने आज झाला. यावेळी शहा यांनी शरद पवार हे हिंदुस्थानच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे म्होरके आहेत असा आरोप केला. देशातील कोणत्याही सरकारच्या काळात संस्थात्मक पद्धतीने भ्रष्टाचार करण्याचे काम कुणी केले असेल तर ते शरद पवार यांनी केले असे मी डंके की चोट पर सांगतो, असे शहा म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. 2014 मध्ये भाजपचे सरकार आले तेव्हा मराठा आरक्षण मिळाले. 2019 मध्ये शरद पवार सत्तेत आल्यानंतर ते आरक्षण गेले, असा दावा शहा यांनी केला.

चक्की पिसिंगचे काय झाले?

शरद पवार यांना शहा यांच्याच सरकारने ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते. आमच्यासोबत काम केलेले अशोक चव्हाण हे तर आजच्या मंचावर शहांच्या मागे बसलेले दिसले. त्यांच्यावर याच भाजपने किती तरी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. आता देवेंद्र फडणवीस यांनी तर चक्की पिसिंग ही लाईन धरली होती. ती कुणासाठी होती, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याकडे नामोल्लेख न करता अंगुलीनिर्देश केला.

डर्टी डझन नेते आज शहांसोबत – सुप्रिया सुळे

अमित शहा यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते डर्टी डझन नेते आज राज्यातील त्यांच्याच भाजप सरकारमध्ये मंत्री किंवा पदाधिकारी आहेत, असा प्रतिहल्ला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.