भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधाननिर्मात्यांचा घोर अपमान केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शाहांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करत रमेश चेन्नीथला म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचाही भाजपाने सातत्याने अपमान केला आहे. संविधानाने घालून दिलेल्या मार्गाने भाजपाचे सरकार काम करत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आरएसएसचा पहिल्यापासूनच विरोध आहे आणि तो लपून राहिलेला नाही. आताही भाजपा आरएसएसचे लोक बाबासाहेबांचे संविधान बदलण्याच्या वल्गना करत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेस पक्षाने नेहमीच सन्मान केला आहे. व त्यांनी घालून दिलेल्या मार्गानेच काँग्रेस पक्ष तसेच काँग्रेस सरकारांनी काम केलेले आहे. अमित शाह यांनी ज्या पद्धतीने संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल विधान केले हे त्यांच्यावर झालेल्या संस्कारातून आले आहे, असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.
दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजाबद्दल भारतीय जनता पक्षाची मानसिकता अत्यंत द्वेषाची आहे. भाजपा शासित राज्यात मागासवर्गीय समाजावर अनन्वीत अत्याचार होतात. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नवीन संसद भवनच्या उद्घाटनाला मोदी सरकारने बोलावले नाही तसेच अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे आमंत्रणही दिले नव्हते यातूनच भाजपाची दलित, आदिवासी समाजाबदद्ल असलेली मानसिकता दिसून येते, असेही रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.