अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर महाराष्ट्रासह देशात संतापाचे वातावरण आहे. त्याचे पडसाद आज दुसऱया दिवशीही विधिमंडळात उमटले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी निळय़ा टोप्या, निळी उपरणी धारण करून हाती बाबासाहेबांचा फोटो घेऊन नागपूरच्या संविधान चौक ते विधिमंडळ असा मोर्चा काढत शहा यांचा निषेध नोंदवला. यावेळी ‘आंबेडकर, आंबेडकर…आंबेडकर, आंबेडकर’, ‘जय भीम…जय भीम’ अशा जोरदार घोषणांनी विधिमंडळ आणि आसपासचा परिसर दुमदुमून गेला. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर महायुती सरकारविरोधातही नारेबाजी केली.
निळी टोपी आणि निळी उपरणे परिधान करून तसेच हातात बाबासाहेबांचा पह्टो घेऊन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरेही मोर्चात सहभागी झाले होते. विधान भवन आवारात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
…हा संविधानाचा व देशातील जनतेचा अवमान – आदित्य ठाकरे
अमित शहा यांनी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच नव्हे तर संविधान व देशातील समस्त जनतेचा अवमान केला आहे. आज देशभरातील जनता त्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे रामदास आठवले, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान व नितीश कुमार हे भारतीय जनता पक्षासोबत राहणार का? बाबासाहेबांना मानणारे खासदार, आमदार राजीनामा देणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यांनी यावेळी केला.
शहा काय माफी मागणार, त्यांची मानसिकताच ती
भाजपची मानसिकता तीच आहे. त्यामुळे अमित शहा आपल्या विधानाप्रकरणी माफी मागणार नाहीत. ते चुकून बोलले असते तर ते माफी मागून मोकळे झाले असते. अनेकदा माणसांकडून चुका होतात. कुणीही चुकू शकते, पण लगेच माफी मागून विनम्रता दाखवली जाते. भाजपची तीच खरी मानसिकता असल्यामुळे अमित शहा माफी मागणार नाहीत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
अमित शहा स्वतःच बोलले, मग विपर्यास कसा?
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, अमित शहा यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला, पण त्यांच्या भाषणात ते स्वतःच बोलले होते. आंबेडकरांचे नाव घेणे सध्या फॅशन झाल्याचे कोण बोलले होते? हे अमित शहाच बोलले होते, मग विपर्यास कसा झाला?
आंबेडकरवादी आमदार हे सहन करणार का?
अमित शहा यांनी माफी मागितलीच पाहिजे अशी मागणी केली आहे, पण माफी मागितली तरी भाजपची मानसिकता बदलणार आहे का? बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान भाजपमधील आंबेडकरवादी आमदार सहन करणार आहेत का? असाही सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.