सर्व फायली तुमच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे जातात… तरीही तक्रार करता? अमित शहांनीच उघड केली एकनाथ शिंदेंची लबाडी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगड दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लबाडी उघड केली. अर्थमंत्री अजित पवारांकडून फायली मंजूर होत नाहीत अशी तक्रार शिंदे यांनी शहा यांच्याकडे करण्याचा प्रयत्न केला, पण सर्व प्रकारच्या फायली तुमच्या हाताखालूनच मुख्यमंत्र्यांकडे जातात… तरीही तक्रारी करता? असा प्रतिप्रश्न करून शहा यांनी शिंदेंनाच एका क्षणात चिडीचूप करून टाकले.

एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची पुणे येथे भेट घेतली होती. त्या भेटीमध्ये त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल शहांकडे तक्रार केली. अर्थ खात्याकडून मिंधे गटातील मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल वेटिंगवर ठेवल्या जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले. महायुतीत आहोत तर निधी वाटप आणि फाईल क्लिअरन्स एकसमान झाले पाहिजे, अशी मागणी शिंदे यांनी केली.

अमित शहा यांनी शिंदे यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि त्यानंतर शहा जे म्हणाले ते ऐकताच शिंदेंचा आवाज बंद झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त व नियोजन विभागाकडे येणाऱ्या फायलींच्या मंजुरी प्रक्रियेत एप्रिलच्या सुरुवातीलाच बदल केला आहे. त्या बदलानुसार अर्थ खात्याकडून मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजुरीसाठी येणाऱया फायली आधी एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात येतात. त्याची आठवण या वेळी शहा यांनी शिंदेंना करून देताच शिंदेंची बोबडी वळल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.