दारुण पराभव दिसत असल्याने अमित शहांकडून जनतेवर हल्ले; केजरीवाल यांचा खळबळजनक आरोप

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने राजधानीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आप, भाजप आणि काँग्रेस अशी लढत दिल्ली विधानसभेसाठी होत आहे. भाजपकडून अरविंद केजरीवाल आणि आपवर सातत्याने हल्ले चढवण्यात येत आहेत. त्यावर आता आपचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर पलटवार करत भाजपचा पराभव निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आता भाजप गुंडगिरी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

याबाबत केजरीवाल यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव निश्चित आहे. त्यामुळे अमित शहा खूप अस्वस्थ आहेत. पराभवाच्या नैराश्यातून आता ते दिल्लीतील जनतेवर हल्ले करत आहेत. विविध ठिकाणी लोकांना उघडपणे धमकावत मारहाण केली जात आहे. पोलिसांना काहीही न करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे नाइलाजाने पोलीस मूकपणे हिंसाचार बघत आहेत. हिंसाचारानंतर गुंडांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येते आणि पीडितांना अटक करून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला जातो, असा खळबळजनक आरोपही केजरीवाल यांनी केला.

आता आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, आपण सर्वांना अमित शहाजींच्या गुंडगिरीविरुद्ध आवाज उठवावा लागेल. आपण सर्वांनी एकजूट असले पाहिजे. आजपासून आपण एक हॅशटॅग सुरू करत आहोत. जर तुम्हाला दिल्लीत कुठेही गुंडगिरीचा सामना करावा लागला तर कृपया हा हॅशटॅग वापरून ट्विट करा. जर तुम्हाला अशा कोणत्याही प्रकरणाची माहिती असेल तर कृपया या हॅशटॅगचा वापर करून ट्विट करा. मी सर्वांना विनंती करतो की जर कुठेही गुंडगिरीची घटना घडली तर त्याचा व्हिडिओ बनवा. पण स्वतःलाही सुरक्षित ठेवा. देव आपल्या सर्वांसोबत आहे. दिल्ली त्यांच्या गुंडगिरीविरुद्ध एकत्रितपणे लढेल, असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.