महाराष्ट्राच्या दैवताचा कुणीही अपमान करा, महाराष्ट्र काहीच करू शकत नाही अशा मस्तीत भाजप वागतोय! – उद्धव ठाकरे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही भरसंसदेत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल हिणकस वक्तव्य करून त्यांचा अपमान केला. त्याबद्दल अमित शहा यांच्यावर तातडीने कारवाई करा, नाहीतर सत्ता सोडा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात महायुतीला राक्षसी बहुमत मिळालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कसेही वाकवा, कसेही झोडा, महाराष्ट्राच्या दैवताचा कुणीही अपमान करा, महाराष्ट्र काहीच करू शकत नाही, अशा मस्तीत भाजप वागायला लागला आहे. ही मस्ती मोडण्याची आता वेळ आली आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर ही तर आता फॅशनच झाली आहे, त्यापेक्षा देवाचे नाव घेतलात तर सात जन्म स्वर्गप्राप्ती होईल, असे अवमानकारक वक्तव्य अमित शहा यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी केले. त्यानंतर देशभरात शहा आणि भाजपविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. अमित शहा यांचा तीव्र निषेध केला जात आहे. उद्धव ठाकरे यांनीही आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना अमित शहा आणि त्यांची पाठराखण करणाऱया भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

भाजपाचे ढोंग आता समोर आले

अमित शहा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांचा अत्यंत हिणकस व उद्दाम उल्लेख अमित शहा यांनी केला आहे. हा उद्दामपणा आहे. भाजपाचा बुरखा फाटून त्यांचे ढोंग आता समोर आले आहे. भाजपाचे हिंदुत्व म्हणजे मुंह में राम आणि बगल में छुरी असे आहे. त्यांना महाराष्ट्र खतम करायचा आहे. आपल्यापूर्वी जन्माला कुणी आलेच नाहीत असे त्यांना दाखवायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

रामदास आठवले आता राजीनामा देणार का?

नेहरू नेहरू करता करता आता आंबेडकरांवर घसरण्याएवढी भाजपाची हिंमत वाढली आहे, अशी टीका करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपाला पाठिंबा देणाऱया पक्षांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, आता मला भाजपाला पाठिंबा देणाऱया इतर पक्षांना विचारायचेय. मग ते नितीशकुमार असोत, चंद्राबाबू आहेत, विशेष म्हणजे रामदास आठवले काय करताहेत? आठवले आता राजीनामा देणार का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातही भाजपासोबत जे मिंधे गेलेत, अजित पवार गेलेत त्यांना बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का? बाबासाहेब आंबेडकर ही खरंच फॅशन झाली आहे हे त्यांना मान्य आहे का हे आता कळलेच पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अदानींचे नाव घेतल्यावर विरोधकांवर कोसळता, आता शहांवर कारवाई करणार का?

भाजपा आणि संघानेही आता खुलासा केला पाहिजे की त्यांनी हे अमित शहांकडून बोलवून घेतलेय का? अदानींचे नाव घेतल्यानंतर आभाळ कोसळावे तसा भाजपा विरोधकांवर कोसळून पडतो. आता बाबासाहेबांचा उल्लेख असा केल्यानंतर भाजपा अमित शहांवर काही कारवाई करणार आहे का? नसेल तर भाजपच्या हृदयामधील काळे आता उघड झाले आहे, असे म्हणत, आतातरी महाराष्ट्र आणि देशाने शहाणे झाले पाहिजे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.

…तर भाजपाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही

भाजपाला संविधान बदलायचे आहे असे इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकी वेळीच सांगत होती. स्वातंत्र्याला 75 वर्षे झाल्याबद्दल संसदेत संविधानावर चर्चा सुरू असताना ज्यांनी देशाला संविधान दिले त्या बाबासाहेबांबद्दल, आंबेडकरांबद्दल, महामानवाबद्दल अमित शहा नावाचा माणूस उद्दामपणे आणि तुच्छतेने कसा बोलू शकतो याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे. नाहीतर भाजपाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. घटनाकर्त्यांचा अपमान करणाऱयाला भाजपा अभय देणार असेल तर मोदींनीसुद्धा सत्तेवर राहता कामा नये, असे सांगतानाच, मोदीजी, एकतर अमित शहा यांच्यावर कारवाई करा नाहीतर सत्ता सोडा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आंबेडकरांचे नाव पुसायला निघालेली भाजपाच पुसून जाईल

बाबासाहेब आंबेडकर केवळ एका पक्षाचे नव्हते. प्रबोधनकार आणि त्यांचे ऋणानुबंध होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही म्हणायचे की, महाराष्ट्राने देशाला दोन दैवते दिली आहेत. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. महाराजांचा भाजपाने अपमान केला आणि आता आंबेडकरांचे नाव पुसायला निघाले आहेत. महाराष्ट्राचे नाव पुसायला निघायले आहेत. पण याद राखा, भाजपावाले पुसले जातील, पण आंबेडकरांचे नाव ते पुसू शकत नाहीत, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला.

यामागे नक्कीच संघ आणि भाजपाचे कारस्थान

अमित शहा एवढे बोलायचे धाडस करतील असे मला वाटत नाही. त्यांना नक्कीच संघाने आणि भाजपाने आंबेडकरांबद्दल असे बोलायला सांगितले असेल. आपण कुठे बोलतोय याची शहांना जाणीव आहे. संसदेत बोलताना जबाबदारीने बोलावे लागते आणि अमित शहांना वरिष्ठांनी तसे सांगितल्याशिवाय ते बोलूच शकत नाहीत, असे म्हणत यामागे संघ आणि भाजपाचेच कारस्थान असल्याचे उद्धव ठाकरे यांनी या वेळी अधोरेखित केले.

दुसऱयाने शेण खाल्ले म्हणून भाजपा खातोय का?

पंतप्रधान मोदी म्हणतात, काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केला, असे पत्रकारांनी विचारले असता, दुसऱयाने शेण खाल्ले म्हणून तुम्ही खाताय का, आधी अमित शहांबद्दल बोला, असे उद्धव ठाकरे यांनी खडसावून सांगितले. अमित शहा राज्यसभेत बोलले आहेत, त्याबद्दल भाजपाने आता त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे ते म्हणाले.

भाजपावाल्यांना मोदी मोदी करून स्वर्ग मिळेल की नाही माहीत नाही, पण आंबेडकर आंबेडकर करणारे लाखो, करोडो भक्त हिंदुस्थानात आहेत. सर्व पक्षांच्या पलीकडे गेलेला तो महामानव आहे. त्यांचा अपमान शिवसेना सहन करणार नाही.

शिवसेना आंदोलन करणार

शिवसेना यावर आंदोलन करणार आहे का असे माध्यमांच्या प्रतिनिधींनी या वेळी उद्धव ठाकरे यांना विचारले. त्यावर शिवसेना आंदोलन करेल, पण सामान्य जनतेला आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का, भाजपा यावर काही कारवाई करणार आहे का, असा प्रतिसवाल उद्धव ठाकरे यांनी केला. अन्यथा जिथे जिथे भाजपाचे नेते आहेत तेथील जनतेने त्यांना विचारायला हवे की त्यांना आंबेडकरांचा अवमान मान्य आहे का, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

बुरसटलेली मनोविकृती पुन्हा आलीय… दूर करावीच लागेल

अमित शहांच्या वक्तव्यानंतर भाजपाची दिल्लीत बैठक झाली आणि विरोधकांना कसे सामोरे जायचे यावर चर्चा झाली असे माध्यमांनी या वेळी उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले की, भाजपाला सगळीकडेच राजकारण दिसतेय. पण आंबेडकरांबद्दल अमित शहा ज्या उद्दामपणे बोलले आहेत ती भाजपाची मनोविकृती जगासमोर आली आहे, त्याबद्दल आता भाजपाने बोलायला पाहिजे. ज्या बुरसटलेल्या रुढी-परंपरांविरुद्ध बाबासाहेबांनी, प्रबोधनकारांनी लढा दिला तीच मनोविकृती आता पुन्हा राज्यावर आली की काय असे आता वाटायला लागले आहे, असे म्हणत ही विकृती आता दूर करावी लागेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

भाजपला महाराष्ट्र गांडुळांचा प्रदेश वाटतोय

उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करूनही भाजपने त्यांच्यावर कारवाई केली नव्हती. मधल्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना भाजप सरकारने भ्रष्टाचार केल्याने आठ महिन्यांत तो कोसळला. महाराष्ट्र हा जणू काही गांडुळांचा प्रदेश आहे असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटायला लागले आहे. महाराष्ट्रातले उद्योगही ते ओरबाडून नेताहेत. मुंबईचे महत्त्व मारायला बघताहेत आणि आता तर कहरच झाला. देशाचे संविधान लिहिणारे महाराष्ट्राचे सुपुत्र, देशाचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाचे गृहमंत्री व भाजपचे एकेकाळचे अध्यक्ष अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणे अपमान केला, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. अमित शहा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओच उद्धव ठाकरे यांनी या वेळी पत्रकारांना ऐकवून दाखवला.

आंबेडकरांना सतावणारी मनोविकृती शहांच्या मुखातून बाहेर पडली

मनू आणि संविधान अशी तुलना भाजपाकडून सुरू झाली आहे का असा प्रश्न माध्यमांनी उपस्थित केला. मी मनुस्मृती म्हणत नाही, पण अशाच मनोविकृतीमुळे आंबेडकर त्रासले होते आणि तिला पंटाळून त्यांना धर्मांतर करावे लागले होते, असे उद्धव ठाकरे त्यावर म्हणाले. माणसाला माणसासारखे जगू द्या असे आंबेडकरांचे म्हणणे होते. माणसासारखे जगू न देणारी ती विकृत मनोवृत्ती होती, तीच अमित शहांच्या मुखातून बाहेर पडली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना नेते, विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी नागपूर येथील दीक्षाभूमीला वंदन केले. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते सुनील प्रभू, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील राऊत, संजय पोतनीस, महेश सावंत, पैलास पाटील, बाळा नर, सिद्धार्थ खरात, गजानन लवटे उपस्थित होते.