
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, नागपूर हिंसाचार, नक्षलवादी हल्ले अशा घटना महाराष्ट्रात घडत असून मणिपूरही गेल्या 21 महिन्यांपासून हिंसाचाराने धगधगत आहे. अशा स्थितीत खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच सध्याच्या घडीला देशात अमली पदार्ध तस्करी, सायबर गुन्हे, संघटित गुन्हेगारी, हवाला यांसारख्या गुह्यांमध्ये वाढ झाल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र, मणिपूर येथील राज्यांतील गृह मंत्रालये गुन्हेगारी रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचेच समोर आले आहे.
राज्यसभेत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेला अमित शहा यांनी उत्तर दिले. एकप्रकारे गृह मंत्रालय अत्यंत कठीण परिस्थितीत काम करत आहे. संविधानाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्यांना दिली आहे. सीमा सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येते. हा अत्यंत योग्य निर्णय आहे. त्यात बदल करण्याची गरज नाही; परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी जर राज्यांची आहे तर 76 वर्षांनंतर गुन्हे राज्यांच्या सीमेपर्यंत मर्यादित नसून ते आंतरराज्यीय आणि बहुराज्यीय बनले आहेत अशी स्थिती का निर्माण झाली आहे, असा सवाल करतानाच विविध राज्यांमध्ये नाकाxटिक्स. सायबर गुन्हे, संघटित गुन्हेगारी, हवाला कांड असे गुन्हे केवळ राज्यांमध्येच घडत आहे, याकडे अमित शहा यांनी लक्ष वेधले. दरम्यान, यावेळी अमित शहा यांनी राज्य पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांचे देशभरातील आणि सीमेवरील सुरक्षा मजबूत करण्याबद्दल आणि देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल आभार मानले.
तीन मुद्दय़ांचे सरकारसमोर आव्हान
2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले. त्यावेळी जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद, तिरुपतीपासून ते पशुपतीनाथपर्यंत पसरलेला आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये असलेला फुटीरतावाद. या तीन मुद्दय़ांवरून देशभरात जवळपास 92 हजार नागरिक चार दशकांमध्ये मारले गेले, असा दावाही अमित शहा यांनी केला. हे तीन मुद्दे मुळापासून नष्ट करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न केला गेला नाही. मोदी सरकार आल्यानंतर या दृष्टीने प्रयत्न सुरू झाला, असेही शहा म्हणाले.
प्रत्येक भाषा देशातील संस्कृतीचा दागिना
देशातील प्रत्येक भाषा हिंदुस्थानातील संस्कृतीचा दागिना आहे, असे अमित शहा म्हणाले. तसेच हिंदीची स्पर्धा कुणाशीच नाही, हिंदी ही सर्व भाषांची सखी आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध करणाऱया डीएमके खासदारांना सुनावले. देशभरातील भाषांना आमचा विरोध कसा असू शकतो. मी गुजरातमधून, निर्मला सीतारामन तामीळनाडूतून आल्या आहेत. आम्ही वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण हिंदुस्थानातील भाषांमध्ये सुरू केले. गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकार याबाबत तामीळनाडू सरकारला विनवणी करत आहे, परंतु त्यांच्यात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण तमिळ भाषेत अनुवादित करण्याची हिंमत नाही, असा आरोप अमित शहा यांनी केला. तसेच आमचे सरकार तामीळनाडूत आले तर आम्ही हे शिक्षण तमिळ भाषेत देऊ, असेही शहा म्हणाले.