इन्स्टावरील ओळखीचे प्रेमात रूपांतर, प्रियकरासाठी अमेरिकन तरुणी आंध्र प्रदेशात

कोणत्या तरुणीला कोणता तरुण आवडेल याचा नेम नाही. अमेरिकेतील एका फोटोग्राफर तरुणीने हिंदुस्थानातील प्रियकराला भेटण्यासाठी थेट हिंदुस्थान गाठले. जॅकलीन फोरेरो असे या तरुणीचे नाव असून ती आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी थेट आंध्र प्रदेशातील एका खेडेगावात दाखल झालीय. आंध्र प्रदेशातील एका खेडेगावात राहणारा चंदन आणि जॅकलीन यांची सर्वात आधी ओळख ही इन्स्टाग्रामवर झाली. सुरुवातीला ‘हाय’पासून या दोघांचे संभाषण सुरू झाले. त्यानंतर हळूहळू हे दोघे कधी प्रेमात पडले. त्यांनाच कळले नाही. दीड वर्षापूर्वी या दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती, परंतु आता या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थानात पोहोचल्यानंतर जॅकलीनने चंदनची भेट घेतली. जॅकलीन ही चंदनपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. जॅकलीनने आपल्या प्रेमाची लव्ह स्टोरी लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी सोशल मीडियावर 45 सेकंदांची एक क्लीप शेअर केली आहे. या क्लीपमध्ये सुरुवातीच्या संभाषणापासून प्रेम होईपर्यंत सर्व काही सांगितले आहे.

लवकरच लग्न करणार

चंदनचे इन्स्टा प्रोफाईल पाहता क्षणी मला ते आवडले. तो एक खरा खिश्चन माणूस असून त्याला धर्मशास्त्राची जाण आहे. संगीत, कला आणि फोटोग्राफी हे आमच्या दोघांमधील साम्य आहे. 8 महिने ऑनलाईन डेटिंग केल्यानंतर मी चंदनला भेटण्यासाठी हिंदुस्थानात दाखल झालेय. माझ्या आईची परवानगी मिळाल्यानंतर आम्ही दोघे लग्न करणार आहोत. मी आता आयुष्यभरासाठी हिंदुस्थानात आलीय. लोक आमच्या नात्याबद्दल वेगवेगळी मते मांडत आहेत. काही लोकांनी चांगले, तर काही लोकांनी वाईट म्हटले आहे, असे जॅकलीन म्हणाली.