
साधारणपणे चार वर्षांपूर्वी क्रिस्टन फिशर नावाची अमेरिकन महिला दिल्लीमध्ये स्थलांतरित झाली. क्रिस्टन फिशरला अमेरिकेपेक्षा हिंदुस्थानात मुलांचे संगोपन करणे चांगले वाटतेय. तीन मुलांची आई असलेल्या क्रिस्टनने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून मुलांना हिंदुस्थानात वाढवण्याचे फायदे सांगितले. त्याची यादीच तिने तयार केलीय. हिंदुस्थानात मुले मोठी झाली की त्यांना संस्कृती – परंपरेची समज येईल, त्यांना विविध भाषा शिकता येतील, त्यांचे कौटुंबिक बंध मजूबत होतील, त्यांच्यामध्ये जागतिक दृष्टीकोन विकसित होईल. स्थानिक आव्हाने समजून घेता येतील तसेच विविध स्तरांतील लोकांसोबत कनेक्ट होता येईल, त्यांचा भावनिक बुद्ध्यांक वाढेल, असे फायदे फिशरने सांगितले.
संस्कृती परंपरेची जाण- क्रिस्टनने लिहिलंय, हिंदुस्थानात राहिल्याने माझ्या मुलांना संस्कृती, भाषा आणि चालीरीतींच्या समृद्ध विविधतेची ओळख होईल.
बहुभाषिकता वाढेल – देशात अनेक भाषा आणि बोलीभाषा आहेत. माझी मुले हिंदी शिकतील आणि इंग्रजीसोबतच इतर भाषा शिकतील.
मजबूत कौटुंबिक बंध – हिंदुस्थानी कुटुंबांमध्ये, आपलेपणाची भावना, भावनिक आधार आणि नाती मिळतात. या गोष्टी अमेरिकच्या संस्कृतीपेक्षा खूप वेगळ्या आहेत.
साधेपणा आणि कृतज्ञ भाव – हिंदुस्थानात राहिल्याने मुलांना कृतज्ञता, साधेपणा आणि त्यांच्याकडील गोष्टींची कदर करण्याचे महत्त्व शिकवता येते.