ट्रम्प चालते व्हा… हुकूमशाहीविरोधात अमेरिकी जनता रस्त्यावर उतरली, पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा उद्रेक!

मनमानी कारभार, नोकऱ्यांत केलेली कपात, बंद करण्यात आलेले विविध सरकारी विभाग, टेरीफ वॉरमुळे होत असलेली अर्थव्यवस्थेची घसरण आणि मानवी हक्कांचे उल्लंघन अशा अनेक मुद्द्यांवरून ‘ट्रम्प-मस्ट गो…’ असे म्हणत अमेरिकेतील रस्त्यांवर जनतेच्या संतापाचा 15 दिवसात दुसऱ्यांदा उद्रेक झाला. शनिवारी देशभरातील 50 हून अधिक राज्यांत ट्रम्प यांच्या हुकूमशाहीविरोधात अमेरिकी जनतेने रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केली. तसेच व्हाईट हाऊसला घेराव घालत ट्रम्प यांच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

आम्हाला राजेशाही नको असे म्हणत लोकांनी ट्रम्प यांच्यावर सभ्यता आणि कायद्याचे राज्य चिरडल्याचा आरोप केला. राजधानी वॉशिंग्टन डीसीसह अमेरिकेतील प्रत्येक राज्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी उद्योगपती एलन मस्क यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी व्हाईट हाऊससह टेस्लाच्या शोरूमलाही घेराव घातला. याआधी 5 एप्रिल रोजी ट्रम्प सरकारविरोधात अमेरिकेतील रस्त्यांवर प्रचंड जनक्षोभ उसळला होता. ट्रम्प यांच्या निषेधाने अमेरिका दुमदुमली.

ट्रम्प हिटलरहून अधिक मूर्ख

आई-वडिलांनी हिटलरच्या उदयाबाबत जे काही सांगितले होते ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मिळतेजुळते आहे. दोघांमध्ये एवढाच फरक आहे की, हिटलर किंवा अन्य फॅसिस्ट नेत्यांहून अधिक मूर्ख ट्रम्प आहेत. त्यांनी देशात फूट पाडली, असा आरोप न्यूयॉर्कमधील 73 वर्षीय आंदोलक कॅथी व्हॅली यांनी केला. तर हे प्रशासन कायद्याच्या राज्यावर आणि नागरिकांवर अत्याचार न करण्याच्या मूलभूत संकल्पनेवरच घाला घालत आहे, असा आरोप 41 वर्षीय व्हाईट हाऊसबाहेर आंदोलन करणाऱ्या 41 वर्षीय बेंजामिन डग्लस यांनी केला.

इमिग्रेशन धोरणाविरोधात संताप

सरकारच्या इमिग्रेशन धोरणाविरोधातही आंदोलकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. ‘नो आईस, नो फीयर, इमिग्रंट्स आर वेलगम हीयर’ म्हणजेच ‘इमिग्रेशन अ‍ॅण्ड कस्टम्स एन्फोर्समेंट नाही, भीती नाही, स्थलांतरितांचे इथे स्वागत आहे’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. तसेच असे असंख्य फलक घेऊन अमेरिकी जनता रस्त्यावर उतरली होती.

50 निषेध, 50 राज्ये, 1 चळवळ

या आंदोलनाला 50501 असे नाव देण्यात आले. 50 निषेध, 50 राज्ये आणि 1 चळवळ असा त्याचा अर्थ होतो. अमेरिकेत कुणी राजा नाही, हुकूमशाहीचा विरोध करा अशा घोषणा सर्वांनी दिल्या. सॅनफ्रान्सिस्कोच्या समुद्रकिनारी शेकडो लोकांनी वाळूत इम्पिच, रिमुव्ह म्हणजेच महाभियोग आणि हटवा असे लिहिले तर काहींनी अमेरिकन झेंडा उलटा फडकावला, जो संकटाचे चिन्ह मानला जातो.