यजमान अमेरिकेच्या जेसिका पेगुला हिने अव्वल मानांकित पोलंडच्या इगा स्विटेकचा पराभव करीत अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची उपात्य फेरी गाठत आणखी एक धक्कादायक निकाल नोंदविला. पुरुष गटात अव्वल मानांकित इटलीच्या यानिक सिनरने माजी विजेत्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करीत कारकीर्दीत प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली.
नोवाक जोकोविच व कार्लोस अल्कारेज हे स्टार खेळाडू आधीच स्पर्धेतून बाद झाल्याने आता पुरुष एकेरीत केवळ यानिक सिनर हाच एकमेव ग्रॅण्डस्लॅम विजेता खेळाडू उरलेला आहे. सिनरने जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम लढतीत दोन सेटने पिछाडीवर पडलेला असतानाही जोरदार पुनरागमन करीत पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत मेदवेदेवचा पराभव केला होता. सिनरने आजच्या उपांत्यपूर्व लढतीतही मेदवेदेवचा 6-2, 1-6, 6-1, 6-4 असा पराभव केला.
आता अमेरिका ओपनची फायनल गाठण्यासाठी सिनरला 25 व्या मानांकित ब्रिटनच्या जॅक ड्रेपरचा पराभव करावा लागेल. ड्रेपरने उपांत्यपूर्व लढतीत दहाव्या मानांकित एलेक्स डी मिनोरचा 6-3, 7-5, 6-2 असा पराभव केला. 2012मधील विजेत्या अॅण्डी मरेनंतर या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा ड्रेपर हा पहिलाच ब्रिटनचा खेळाडू ठरलाय.
पेगुला प्रथमच उपांत्य फेरीत
महिला एकेरीत 30 वर्षीय जेसिका पेगुला हिने इगा स्विटेकचा 6-2, 6-4 असा सहज पराभव करीत कारकीर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. याआधी सहाव्या मानांकित पेगुलाला ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सहा वेळा उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागलेला होता.
आता पेगुलाच्या मार्गात बिगरमानांकित झेक प्रजासत्ताकच्या पॅरोलिना मुचोवा हिचे आव्हान असेल. फ्रेंच ओपनमधील उपविजेत्या पॅरोलिनाने पॅरोलिनाने 22व्या मानांकित ब्रीट्रिज हदाद माइया हिचा 6-1, 6-4 असा पराभव करीत सलग दुसऱयांदा अमेरिकन ओपनची उपांत्य फेरी गाठली.