
एका अमेरिकन व्यक्तीने कोर्टात सुनावणीदरम्यान बाजू मांडण्यासाठी स्वतःच्या एआय अवताराचा वापर केला. त्याच्या या कृत्यावर न्यायाधीश चांगलेच चिडले. अखेर त्याला कोर्टाची माफी मागावी लागली. 26 मार्च रोजी न्यूयॉर्क येथील अपील न्यायालयात रोजगारासंदर्भात खटल्यात ही विचित्र घटना घडली. तक्रारदार जेरोम डेवोल्डने सुनावणी सुरू असताना आपल्या युक्तिवादासाठी एक व्हिडीओ सादर केला. न्यायमूर्ती मॅन्झानेट डॅनियसल्स यांना संशय आल्याने त्यांनी व्हिडीओ मधेच थांबवला. त्यावर अपीलकर्ता जेरोम डेवोल्डने व्हिडीओतील व्यक्ती खरी नसून त्याचा एआय अवतार असल्याचे सांगितले. यावर न्यायाधीश संतापले. मला दिशाभूल केल्याचे आवडत नाही, असे म्हणत न्यायाधीशांना रागारागाने व्हिडीओ बंद करायला सांगितला. याप्रकरणी अपीलकर्त्याने नंतर कोर्टाची माफी मागितली. ‘माझा हेतू कधीही फसवणूक करण्याचा नव्हता, तर माझे युक्तिवाद शक्य तितक्या कार्यक्षम पद्धतीने सादर करण्याचा होता, असे डेवोल्डने म्हटले.
या घटनेवर आपली बाजू मांडताना अपीलकर्ता डेवाल्डने सांगितले की, माझ्याकडे प्रतिनिधित्व करणारा वकील नव्हता. माझी बाजू मलाच मांडायची होती. माझ्यासाठी हे काम सोपे नव्हते. आधीच्या सुनावणीत मी खूप अडखळलो होतो. पण एआय हे काम चांगलं करेल, असे मला वाटले.
डेवल्डने कबूल केले की त्याने स्वतःचा एआय अवतार तयार करण्यासाठी सॅन फ्रान्सिस्कोच्या एका टेक फर्मने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचा वापर केला. सुरुवातीला हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा अवतार तयार करायचा होता, मात्र त्यात काही तांत्रिक समस्या आल्या.