अमेरिका पाच लाख घुबडांची कत्तल करणार

काही दिवसांपूर्वी केनियाने 10 लाख कावळ्यांना मारण्याची योजना आखली होती. अमेरिकाही आता असंच काहीसे करायला निघाली आहे. मात्र अमेरिका कावळ्यांना नव्हे तर घुबडांना मारणार आहे. तेही थोडेथोडके नव्हे, तर पाच लाख घुबडांना मारणार आहे.

अमेरिकेत ‘स्पॉटेड’ घुबड म्हणजेच ठिपकेदार घुबडांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या जिवाला सर्वात जास्त धोका ‘बार्ड’ घुबडांचा म्हणजे पट्टेदार घुबडांचा आहे. म्हणून ‘बार्ड’ घुबडांना मारण्याचे अमेरिकेने ठरवले आहे. येत्या 30 वर्षांमध्ये ‘बार्ड’ घुबडांना गोळ्या मारल्या जाणार आहेत. बार्ड घुबड मुख्यत्वे पूर्व अमेरिकेत आढळतात. मात्र त्यांनी पश्चिम दिशेला आक्रमण केलेय. त्यांनी स्पॉटेड घुबडांच्या जागांवर घुसखोरी केली. आकाराने लहान असलेले स्पॉटेड घुबड हे अतिक्रमण सहन करू शकत नाहीत.

गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेत ठिपकेदार घुबडांना वाचवायचे प्रयत्न होत आहेत. त्यासाठी जंगलं वाचवली जात आहेत.

वन्यजीव प्रेमींची नाराजी
एवढय़ा मोठय़ा संख्येने घुबडांना मारले जाणार आहे, त्यामुळे वन्यजीव प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका जिवाला वाचवण्यासाठी दुसऱया जिवाला मारणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वन संरक्षणातील बेपर्वाईवरून लक्ष्य हटवण्यासाठी हे काम सुरू असल्याची टीका होत आहे तर काहींनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.