…तर अमेरिकेत पुन्हा निवडणुका होऊ देणार नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेतील ख्रिश्चन धर्मीयांनी मला मत दिले तर त्यांना चार वर्षांनी पुन्हा मतदान करावे लागणार नाही याची मी काळजी घेईन, असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या वादाची ठिणगी टाकली आहे. पुन्हा मतदान करावे लागणार नाही म्हणजेच देशात पुन्हा निवडणुका होऊ देणार नाही हा यातील गर्भितार्थ अधोरेखित करत विरोधी पक्षनेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

ट्रम्प हे हुकूमशहा प्रवृत्तीचे आहेत. ते लोकशाही नष्ट करतील, असा दावा विरोधी नेत्यांनी केला आहे. शनिवारी फ्लोरिडामध्ये एका पुराणमतवादी गटाच्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी वरील विधान केले होते. ख्रिश्चनांनी घराबाहेर पडून मला मतदान करावे. मग पुढील चार वर्षांत मी सर्व काही ठीक करेन. चार वर्षानंतर त्यांना पुन्हा मतदानासाठी यावे लागणार नाही. सर्व काही चांगले होईल, असे सांगत ट्रम्प म्हणाले की, ते स्वतः ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवतात आणि सर्व ख्रिश्चनांवर खूप प्रेम करतात.