
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ अर्थात परस्पर शुल्क लादून संपूर्ण जगाची कोंडी केली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ अस्त्राचा फटका अब्जाधीशांनाही बसत असून सलग दुसऱया दिवशी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत लक्षणीय घट झाली. शेअर बाजारावर याचे परिणाम जाणवत असतानाच जगातील 500 श्रीमंत व्यक्तींनी एकाच दिवसात अब्जावधी रुपये गमावले. ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री तथा टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची सर्वाधिक 19.9 अब्ज डॉलर्स एवढी संपत्ती घटली आहे.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गेल्या 13 वर्षांत चौथ्यांदा जगातील अब्जाधीशांवर ही वेळ आली आहे. यापूर्वी कोरोना काळात उद्योगपतींचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आकडेवारीनुसार प्रत्येक अब्जाधीश व्यक्तीला सरासरी 3.3 टक्के एवढा तोटा सहन करावा लागला आहे. एलॉन मस्क, बिल गेट्स आणि मुकेश अंबानी या सर्वांच्या संपत्तीत घट झाली. सर्वाधिक नुकसान मस्क यांचे झाले तर वॉरेन बफे आणि लॅरी एलिसन यांचाही या यादीत नंबर लागतो.
मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती 9.44 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मेटाचे शेअर्स चांगले वाढत होते, मात्र फेब्रुवारीच्या मध्यापासून गुंतवणूकदारांनी विक्रीस प्राधान्य दिल्याने ते 28 टक्क्यांनी घसरले आहेत. एप्रिल 2022 नंतर प्रथमच अॅमेझॉनचे शेअर्स धडाम झाले आहेत. त्यामुळे जेफ बेझोस यांचे तब्बल 7.59 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. मस्क यांना 19.9 अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची गेल्या 24 तासांत संपत्ती जवळपास 3 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे.
सर्वाधिक नुकसान झालेले अब्जाधीश
एलॉन मस्क, अमेरिका 19.9 अब्ज डॉलर्स
जेफ बेझोस, अमेरिका 7.59 अब्ज डॉलर्स
मार्क झुकरबर्ग, अमेरिका 9.44 अब्ज डॉलर्स
बर्नार्ड अर्नाल्ट, फ्रान्स 5.23 अब्ज डॉलर्स
बिल गेट्स, अमेरिका 6.54 अब्ज डॉलर्स
वॉरेन बफे, अमेरिका 10.7 अब्ज डॉलर्स
लॅरी एलिसन, अमेरिका 10.1 अब्ज डॉलर्स
लॅरी पेज, अमेरिका 4.65 अब्ज डॉलर्स
मुकेश अंबानी, हिंदुस्थान 2.98 अब्ज डॉलर्स
गौतम अदानी, हिंदुस्थान 1.96 अब्ज डॉलर्स