
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धोरणामुळे जगभरात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या निर्णयाच्या परिणामामुळे जगभरातील शेअर बाजार भूईसपाट झाले. अमेरिकेचा शेअर बाजारही या तडाख्यातून सुटला नाही. चीनने मात्र अमेरिकेला प्रत्युत्तर देत त्यांच्या मालवर 34 टक्के अतिरिक्त शुल्क लादण्याची घोषणा केली. त्यामुळे चवताळलेल्या ट्रम्प यांनी चीनवर 125 टक्के टॅरिफ लादला आहे. तसेच ट्रम्प यांनी जगभराला दिलासा देत चीनवगळता इतर 75 देशांसाठी टॅरिफचा निर्णय 90 दिवसांसाठी स्थगित केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता सर्व देशांसाठी ९० दिवसांच्या शुल्कावरील स्थगितीची घोषणा केली. अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉ वाढत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी शुल्काबाबत दोन मोठ्या घोषणा केल्या. त्यामुळे इतर सर्व देशांना दिलासा मिळाला. मात्र, ट्रम्प यांनी चीनला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेने चीनवरील आयात शुल्क 104% पर्यंत वाढवल्यानंतर बीजिंगने प्रत्युत्तर देत अमेरिकेच्या आयातीवर 34% अतिरिक्त शुल्क लादण्याची घोषणा केली. चीनने ही वाढ मागे घतेली नाही तर अमेरिका आणखी 50 टक्के कर लादेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. तो आता त्यांनी खरा करून दाखवला आहे.
ट्रम्प यांनी चीनवरील टॅरिफ वाढवत तो 125 टक्के केला आहे. तसेच तो तात्काळ प्रभावी होणार आहे. तसेच अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचे दिवस आता संपले आहेत, हे चीनला लवकरच समजेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात अमेरिका- चीनमधील संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. चीनला दणका देत टॅम्प यांनी जगाला दिलासा दिला आहे. इतर देशांसाठी टॅरिफ धोरणाला 90 दिवसांसाठी स्थगिती देत असल्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली.
हिंदुस्थानावर 26 टक्के टॅरिफ लागू करण्यात आला होता. मात्र, आता त्यांतू थोडासा दिलासा मिळाला असून अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारावर काम सुरू असल्याचे वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेल्या टॅरिफ धोरणामुळे नव्या संकटात सापडले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळले.
या टॅरिफ योजनेवर आपण ठाम असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले होते. मात्र, अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ट्रम्प यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यांनी ट्ररिफच्या निर्णयाला 90 दिवसांची स्थगिती दिली आहे. ज्या 75 देशांनी अमेरिकेच्या प्रतिनिधींना व्यापार चर्चेसाठी बोलावले आहे, त्यांना 90 दिवसांची टॅरिफ स्थगिती आणि परस्पर शुल्कात घट करण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेसोबत व्यापार चर्चा करणाऱ्या देशांमध्ये हिंदुस्थानचाही समावेश आहे. मात्र, चीनवर त्यांनी तात्काळ प्रभावाने 125 टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केल्याने आगामी काळात अमेरिका चीन टॅरिफ वॉर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.