अमेरिकेतील 9 लाख स्थलांतरितांना ‘दे धक्का’, ताबडतोब देश सोडण्याचे आदेश

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील 9 लाख स्थलांतरितांना मोठा धक्का दिला आहे. हे स्थलांतरित माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळात आणलेल्या सीबीपी वन ऍप धोरणाद्वारे अमेरिकेत आले होते. ट्रम्प प्रशासनाने बायडेन यांचे धोरण बदलून या स्थलांतरितांचे अमेरिकेत राहण्याचे कायदेशीर परवाने रद्द करून त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने (डीएचएस) यासंबंधी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की सीबीपी वन ऍपद्वारे आलेल्या स्थलांतरितांनी त्वरित देश सोडावा. अन्यथा कायदेशीर कारवाईंना सामोरे जावे लागेल. जानेवारी 2023 पासून बायडेन प्रशासनाच्या या ऍप धोरणाअंतर्गत 9 लाखांहून अधिक स्थलांतरित अमेरिकेत आले. त्यांना दोन वर्षांसाठी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची, काम करण्याची परवानगी मिळाली होती. मात्र आता डीएचएसने त्यांचे परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे स्थलांतरितांनी स्वतःहून अमेरिका सोडावी. सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि देशाची सुरक्षा अधिक चांगली करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे डीएचएसने सांगितले. डीएचएसच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास स्थलांतरितांकडून दिवसाला रुपये 85,500 दंड वसुल केला जाणार आहे.

 ज्या लोकांना या नोटिसा मिळाल्या आहेत, त्यापैकी बहुसंख्य लोक होंडुरास, अल साल्वाडोर आणि मेक्सिकोमधील आहेत. नोटिसा मिळाल्यानंतर या लोकांमध्ये अस्वस्थता आहे.

 स्थलांतरित त्यांच्या पुढच्या प्रवास व्यवस्थेसाठी नवीन सीबीपी ऍप वापरू शकतात. युनायटेड स्टेटमध्ये राहण्याचा प्रयत्न करू नका. संघीय सरकार तुम्हाला शोधेल. त्यामुळे ताबडतोब यूएस सोडा, असे नोटिसीद्वारे सांगण्यात आले आहे.