अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी 19 जणांना स्वातंत्र्याचे राष्ट्राध्यक्ष पदक प्रदान केले. यात उद्योजक जॉर्ज सोरोस, परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन आणि जगप्रसिद्ध फुटबॉलपटू मेस्सीसह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. जॉर्ज सोरोस यांच्याशी संगनमत करून मोदी सरकार उलथवून टाकण्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रयत्न केल्याचा खोटा आरोप भाजपने केला होता. आता अमेरिकेनेच सोरोस यांना सर्वोच्च पुरस्कार देऊन मोदी सरकारला जोरदार चपराक दिल्याची चर्चा रंगली आहे.
हिंदुस्थानच्या राजकारणावर प्रभाव टाकण्याचे गंभीर आरोप सोरोस यांच्यावर झाले. सोरोस यांच्या मुलाने हे पदक स्वीकारले. चार पदके मरणोत्तर देण्यात आली असून यात मिशिगनचे माजी गव्हर्नर जॉर्ज डब्ल्यू, रोमनी, माजी अॅटर्नी जनरल आणि सिनेटर रॉबर्ट एफ. केनेडी, माजी संरक्षण सचिव अॅश कार्टर आणि मिसिसिपी फ्रीडम डेमोव्रॅटिक पार्टीचे संस्थापक आणि 1965 च्या मतदान हक्क कायद्याचे संस्थापक फॅनी लू हॅमर यांचा समावेश आहे. दरम्यान, मेस्सी पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित नव्हता.
माजी बास्केटबॉल दिग्गज तसेच उद्योगपती इर्विन मॅजिक जॉन्सन यांनाही या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले. मेस्सी हा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित नव्हता. याशिवाय अभिनेता मायकेल जे फॉक्स, संवर्धनवादी जेन गुडॉल, व्होग मासिकाच्या दीर्घकाळ संपादक-इन-चीफ अॅना विंटूर, अमेरिकन फॅशन डिझायनर राल्फ लॉरेन, अमेरिकन फिल्म इन्स्टिटय़ूटचे संस्थापक जॉर्ज स्टीव्हन्स ज्युनियर, उद्योजक आणि एलजीबीटीक्यू कार्यकर्ते टिम गिल आणि कार्लाइल ग्रुप ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्मचे सह-संस्थापक डेव्हिड रुबेस्टाईन यांचाही सन्मान करण्यात आला.