नववर्षाच्या आनंदाला अमेरिकेत गालबोट! भरधाव ट्रकने अनेकांना चिरडलं, 10 जणांचा मृत्यू, 30 जखमी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेतील न्यू ऑर्लीन्समध्ये एक दुःखद घटना घडली आहे. येथे एका भरधाव ट्रकने गर्दीला धडक देत अनेकांना चिरडलं. या धडकेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज पहाटे 3:15 च्या सुमारास न्यू ऑर्लीन्समधील बोर्बन स्ट्रीट आणि इबरव्हिल दरम्यान असलेल्या क्रॉसरोडवर नववर्षानिमित्त लोक आनंदोत्सव साजरा करत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमधून खाली उतरताच चालकाने जमावावर गोळीबार सुरू केला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये लोक रस्त्यावर धावपळ करताना दिसत आहे आणि यात गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ट्रक चालकाने गोळीबार सुरू केल्यानंतर न्यू ऑर्लीन्स पोलिसांनीही बचावासाठी त्यावर गोळीबार केला. दरम्यान, घटनेनंतर जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच आरोपी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.