अमेरिकेने 4 हिंदुस्थानी कंपन्यांवर घातली बंदी; काय आहे कारण? वाचा…

अमेरिकेने हिंदुस्थानच्या चार कंपन्यांवर मोठी कारवाई करत त्यांच्यावर बंदी घातली आहे. इराणच्या कच्च्या तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या व्यापारात सहभागी असल्याने या कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सोमवारी याबाबत माहिती जाहीर केली होती.

इराणमधील तेल विक्री थांबवण्यासाठी ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटच्या ऑफिस ऑफ फॉरेन अ‍ॅसेट्स कंट्रोल (OFAC) आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने विविध देशांमधील 30 हून अधिक व्यक्ती आणि कंपन्यांवर बंदी घातली आहे. या यादीत हिंदुस्थानातील चार कंपन्या देखील आहेत.

ओएफएसी आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यात चार हिंदुस्थानी कंपन्या आहेत, ज्यात नवी मुंबई येथील फ्लक्स मेरीटाईम एलएलपी, नॅशनल कॅपिटल रीजन, बीएसएम मरीन एलएलपी, ऑस्टिनशिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कॉसमॉस लाइन्स इंक या कंपन्यांचा समावेश आहे. यामधील चारपैकी तीन कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. कारण त्या इराणी तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या वाहतुकीत तांत्रिक व्यवस्थापक म्हणून काम करत होते. तर कॉसमॉस लाइन्सवर इराणी पेट्रोलियमच्या वाहतुकीत सहभागी असल्याबद्दल बंदी घालण्यात आली आहे.