बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेने धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. बांगलादेशात अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल हिंदुस्थानात चिंता व्यक्त केली जात आहे. यातच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे की, ”मूलभूत स्वातंत्र्यांचा आदर केला पाहिजे. सरकारांनी कायद्याचे नियम पाळले पाहिजेत आणि नागरिकांच्या मानवी हक्कांचे रक्षण केले पाहिजे.”
याचदरम्यान अमेरिकन खासदार ब्रॅड शर्मन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “हिंदू अल्पसंख्याकांचे संरक्षण करणे ही बांगलादेशच्या अंतरिम सरकारची जबाबदारी आहे.” यातच हिंदूॲक्शनचे कार्यकारी संचालक उत्सव चक्रवर्ती यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या विरोधात होणार हिंसाचार आणखी वाढू नये यासाठी सर्व शक्य पावले उचलण्याचे आवाहन बायडन -हॅरिस प्रशासनाला केले आहे.
ते म्हणाले की, “आम्हाला बांगलादेशातून मिळत असलेल्या प्रतिसादाच्या आधारे असे म्हणता येईल की, ”अंतरिम सरकारने अटक केलेले नागरी हक्क कार्यकर्ते चिन्मय कृष्ण ब्रह्मचारी यांच्या जीवाला कोठडीत धोका आहे.”